Join us  

लिफ्ट उघडण्याची घाई बेतली जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:01 AM

लिफ्ट उघडण्याची घाई वांद्रे येथील लिफ्ट दुर्घटनेतील सुरक्षारक्षक राध्येश्याम हरिजनच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक माहिती लिफ्ट निरीक्षकांनी वांद्रे पोलिसांना सादर केलेल्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

मुंबई : लिफ्ट उघडण्याची घाई वांद्रे येथील लिफ्ट दुर्घटनेतील सुरक्षारक्षक राध्येश्याम हरिजनच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक माहिती लिफ्ट निरीक्षकांनी वांद्रे पोलिसांना सादर केलेल्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. याचा अंतिम अहवाल दोन दिवसांत सादर होणार आहे. त्या अहवालानुसार, पुढे योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.वांद्रे येथील १८ मजली एव्हरेस्ट अपार्टमेंटमध्ये राध्येश्याम हरिजन (६०) हा सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. २८ जून रोजी लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला आणि ११व्या मजल्यावरून खाली पडून हरिजन यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत वांद्रे पोलिसांनी तपास सुरू केला होता.या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागातील लिफ्ट निरीक्षकांकडून चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशी अहवाल सोमवारी वांद्रे पोलिसांना सादर करण्यात आला. या चौकशी अहवालात कुणालाही दोषी ठरविण्यात आलेले नाही. हरिजनने ११ व्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी लिफ्ट बोलावली. मात्र ती लवकर न आल्याने त्याने चावी अथवा कशाच्या तरी साहाय्याने ती उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडताच, लिफ्ट आली समजून त्यांनी आत प्रवेश केला आणि ते खाली पडले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती तपासात समोर आली. अंतिम अहवालानुसार कारवाई करण्यात येईल, असे वांद्रे पोलीस ठाण्याचे व.पो. निरीक्षक गिरीश अनवकर यांनी सांगितले.>लिफ्ट कोसळण्याच्या दुर्घटनामार्च २०१५ - मालाड येथे एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.आॅक्टोबर २०१५ - नागपाडा येथे सुलेमान टॉवरची लिफ्ट दहाव्या मजल्यावरून कोसळून चार जण जखमी झाले होते.मे २०१७ - वांद्रे येथील एका इमारतीमधील लिफ्टच्या दुर्घटनेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.जून २०१८- घाटकोपर पूर्व येथील शांतीनगर पोलीस हाउसिंग सोसायटीतील इमारतीची लिफ्ट कोसळून सात जण जखमी.