Join us

विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तूंना यंदाही लेटमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 02:18 IST

दरवर्षी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू द्याव्या की रक्कम याबाबतचा वाद अद्याप कायम आहे.

मुंबई : दरवर्षी विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू द्याव्या की रक्कम याबाबतचा वाद अद्याप कायम आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने काही वस्तूंचे वाटप तर काही वस्तूंचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गणवेश, बूट व मोजे, पावसाळी सॅण्डल, शाळेची बॅग, वह्या, रेनकोट देण्यासाठी आता निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र पालिका शाळा १७ जून रोजी सुरू होत असल्याने त्यापूर्वी ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन शालेय वस्तू मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षीही विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंची प्रतीक्षा करावी लागणार आहे.पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना २००७ पासून २७ शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे. मात्र या वस्तूंचे वाटप वेळेत होत नसल्याच्या तक्रारी दरवर्षी केल्या जातात. तसेच ठेकेदारांनी पुरवलेल्या वस्तूंच्या दर्जावरही शंका उपस्थित होत असल्याने पालिकेने वस्तूंऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजकीय पक्षांनी विद्यार्थ्यांना वस्तूच देण्याची मागणी लावून धरली. तरीही प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असल्याचा फटका या प्रस्तावाला बसला. या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने अखेर याबाबतचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने आणला आहे. परंतु, काही वस्तूंचे थेट वाटप तर काही वस्तूंऐवजी पैसे या भूमिकेवर प्रशासन ठाम आहे.मात्र नवीन प्रस्तावानुसार निविदा प्रक्रियेद्वारे गणवेश, बूट व मोजे, पावसाळी सॅण्डल, शाळेची बॅग, वह्या, रेनकोट घेण्यात यावे. तर पाण्याची बाटली, जेवणाचा डबा व स्टेशनरी या वस्तूंकरिता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने प्रस्तावातून स्पष्ट केलेआहे. हा प्रस्ताव शिक्षणसमितीच्या पटलावर मंजुरीसाठी पालिका प्रशासनाने मांडलाआहे. त्यामुळे या विषयावरवादळी चर्चा होण्याची शक्यताआहे. तसेच शाळा सुरू होण्यास अवघा पंधरवडा उरला असताना पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश, वह्या मिळण्याची शक्यता धूसर असल्याची नाराजी विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे.>असे मिळणार विद्यार्थ्यांना अनुदानविद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत अथवा नजीकच्या पोस्ट आॅफिसमध्ये बचत खाते उघडावे.सर्व विद्यार्थ्यांची नावे व बचत खाते क्रमांकासह यादी शाळेने संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे सादर करावी.सर्व शाळांमध्ये पालकांची सभा घेऊन या अनुदानाबाबत त्यांना कल्पना द्यावी.अनुदानासाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी रक्कम संबंधित विभागीय लेखा अधिकारी यांच्यामार्फत बँक खात्यात वळती करावी व त्या खात्यातून एनईएफटी/ आरटीजीएस आदीद्वारे त्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करावी.२०१९-२०२० - १८ कोटी तीन लाख ४० हजार ८५४ रुपये तर २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात १८ कोटी ८९ लाख २८ हजार ५१५ रुपये असे एकूण ३६ कोटी ९२ लाख ६९ हजार ३६९ रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरणद्वारे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.