Join us  

लेखमाला - क्रिप्टोचलनाची सुरसकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:06 AM

इंट्रो:आपल्या संगणकामधील कोणतीही फाइल जशी आपण सहज कॉपी करू शकतो किंवा तिची नक्कल करून परत तयार करू शकतो ...

इंट्रो:

आपल्या संगणकामधील कोणतीही फाइल जशी आपण सहज कॉपी करू शकतो किंवा तिची नक्कल करून परत तयार करू शकतो तसं स्वतःच्याच बिटकॉइन संदर्भात शक्य आहे का ? अथवा दोन वेगवेगळे डीव्हायसेस वापरून तीच बिटकॉइन नाणी पुनः खर्च करणं, तेही, एकाचवेळी, शक्य आहे का? किंवा एखाद्याला एखादी वस्तू विकताना त्याच्याकडे स्वतःचे बिटकॉइन्स आहेत का, हे कसं ओळखायचं ? आणि जगातील ‘सर्वोत्तम’ हॅकर्सना या प्रणालीचा कोड ब्रेक करणं, ती सिस्टम हॅक करणं शक्य आहे का? या आणि अशा सर्व प्रश्नांचं बिटकॉइनकडे असलेलं उत्तर आणि डिजिटल विश्वास खऱ्याखुऱ्या स्वरूपात निर्माण करण्याचा हा प्रयत्न.

-------------------------------

खरं म्हणजे ब्लॉकचेन हे सर्व क्रिप्टो व्यवहारांची नोंद ठेवणारं एक मोठ्ठं ऑनलाइन लेजर (लॉगबुक) आहे. पहिल्या बिटकॉइन पेमेंटपासून ते या क्षणापर्यंतच्या आणि भविष्यातील संभाव्य व्यवहारांची नोंद या ठिकाणी अज्ञात, अनाम रीतीने वा छद्म (pseudo) अज्ञात पद्धतीने ठेवली जातेय आणि जाईल. ब्लॉककचेनचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते सार्वजनिक असून, एका मध्यवर्ती ठिकाणी साठविण्याऐवजी सर्व माहिती प्रत्येक बिटकॉइन उपयोगकर्त्याला वितरित करून विकेंद्रितरीत्या साठविली जाते.

सर्व माहिती खुली आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध असल्यामुळे फ्रॉडची शक्यता कमी होते. कारण एखादी मालमत्ता सर्वांदेखत लांबवणे वा नक्कल करून पळवणं शक्य नसतं. फ्रॉडची शक्यता घटण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रत्येक बिटकॉइनचं इतिहास त्यासोबतच असतो. त्यामुळे त्याची नक्कल करायची झाल्यास बिटकॉइनच्या सुरुवातीपर्यंतच्या माहितीची नक्कल करणं आवश्यक ठरतं. तेदेखील सिस्टम सहजासहजी मान्य करत नाही, कारण लेजरच्या करोडोप्रति बिटकॉइनच्या नेटवर्कवर कुठेनकुठे असतातच. त्यांच्याकडे या नकलेचं रेकॉर्ड नसल्यामुळे आणि हा तयार केलेल्या इतिहास नसल्यामुळे फ्रॉडची शक्यता घटते.

एवढ्या विस्तृतपणे वितरित लेजरमुळे कुणाकडे काय आणि किती आहे हे सहज कळतं आणि मग एक पारदर्शकता येते. यापूर्वीच्या कोणतीही क्रिप्टोचलनास शक्य न झालेली गोष्ट साध्य करण्यात सातोशी नाकामोटोला यश लाभलंय आणि ही गोष्ट म्हणजे इतक्या विस्तृत प्रमाणात विकेंद्रित असलेल्या लेजरचं ‘अपडेटिंग’. एकाचवेळी कोणत्याही फसवणुकीशिवाय हे कसं शक्य झालंय?

या प्रश्नाच्या उत्तरातूनच 'ब्लॉकचेन' नाव सार्थ ठरून 'विकेंद्रित डिजिटल विश्वास' प्रत्यक्षात आला आहे. बिटकॉइनचं सॉफ्टवेअरच मुळी अशाप्रकारे तयार करण्यात आलंय की ते नियमितपणे स्वतःला सतत अपडेट करत राहील. त्यासाठी ते प्रत्येक खासगी किल्लीद्वारे तपासलेल्या व्यवहाराला लक्षात घेऊन नेटवर्कवरील शेवटच्या अपडेटनंतर लगेच एक मोठा ब्लॉक त्याठिकाणी टाकला जाईल की ज्यायोगे यालेजरवर एक प्रकारची ब्लॉक शृंखला (चेन) तयार होईल. म्हणून 'ब्लॉकचेन' हे या तंत्रज्ञानाचं नाव सार्थ ठरतं. नाकामोटोने कोणत्याही मध्यवर्ती परवानगीशिवाय नियमितपणे अद्ययावत आणि ब्लॉककची निर्मिती सातत्यानं होत राहण्याचं तंत्र अत्यंत हुशारीने शोधले. त्याकरिता मध्यवर्ती 'टाइमकीपर'चीसुद्धा गरज नाही. चेनमध्ये ब्लॉकला अँड करण्यासाठी नेटवर्कमधील संगणकांना एक किचकट आणि वेळखाऊ अलगोरीदम सोडवावा लागतो. तो सोडविल्यावर ज्या संगणकाला ही उकलचटकन सापडते तो ती उकल संपूर्ण नेटवर्कवर पाठवितो आणि संपूर्ण चेनवर व्यवहारांचे ‘ब्लॉक्स’ समाविष्ट केले जातात. अलगोरीदम सोडविणे कठीण असले तरी तपासणे सोपे असल्यामुळे संपूर्ण नेटवर्कला अपडेट होण्याचा संदेश दिला जातो. अलगोरीदम हा रॅन्डम एलिमेंट असल्यामुळे नेटवर्कमधील कोणताही संगणक तो सोडविण्याची संधी साधू शकतो. परिणामी एकाच शक्तिशाली संगणकाद्वारे मध्यवर्ती नियंत्रण राखणं कठीण होते.

तर असं आहे हे 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञान. क्रिप्टोचलन अधिक सुरक्षित बनवतो असा दावा करण्यात येतोय, तेही असुरक्षित वाटणाऱ्या डिजिटल वातावरणात. मग भारत सरकारचं या डिजिटल चलनविषयीचं धोरण, याविषयीची उपाययोजना, आणि विधेयक या सर्वांविषयी माहिती पुढील लेखांकामध्ये.

- शैलेश माळोदे (लेखक विज्ञान पत्रकार आणि व्यवसाय क्षेत्राचे अभ्यासक आहेत)