Join us  

नियम मोडणाऱ्यांना ‘लेझर कॅमेरा’ टिपणार

By admin | Published: March 27, 2017 4:36 AM

मुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहन संख्या आणि त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे वाढत जाणारे प्रमाण पाहता मुंबई वाहतूक

सुशांत मोरे /मुंबईमुंबईत दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहन संख्या आणि त्यामुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे वाढत जाणारे प्रमाण पाहता मुंबई वाहतूक पोलिसांकडून मुंबई पालिकेच्या साहाय्याने वाहनचालकांविरोधात कारवाईसाठी नवनवीन यंत्रणा आणल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिग्नलवर ‘लेझर कॅमेरे’ बसवण्याचा प्रस्ताव आहे. यात सिग्नल, झेब्रा क्रॉसिंगचा नियम मोडणारे वाहनचालक रडारवर असतील आणि त्यातून त्वरित ई-चलान दंड आकारला जाईल. सध्या या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.नियम मोडल्यामुळे अपघात होतानाच वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये खटके उडतात. एकंदरीतच वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या आणि वाहनचालकांवर कारवाई करणे सोपे जावे यासाठी मुंबईत बसवण्यात आलेल्या ४,७00 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सध्या कारवाई केली जात आहे. त्यातून सिग्नल असतानाही वाहतुकीचे विविध नियम मोडणाऱ्या चालकाचे वाहन सीसीटीव्हींद्वारे टिपले जाते आणि ई-चलान करून दंड आकारला जातो. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात असणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून हे सीसीटीव्ही हाताळण्यात येतात आणि कारवाईसाठी नियम मोडणाऱ्या चालकांची नंबर प्लेट कॅमेऱ्यात टिपली जाते. परंतु ही कारवाईदेखील सहज व आणखी वेगाने करता यावी आणि त्यात तत्परता राहावी यासाठी पालिकेच्या साहाय्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी ‘लेझर कॅमेरे’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)स्वयंचलित कॅमेरेमुंबईतील सिग्नलवरच बसवले जाणारे हे कॅमेरे स्वयंचलित असतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही कमी होण्यास मदत मिळेल, अशी माहिती देण्यात आली. सिग्नल आणि झेब्रा क्रॉसिंग नियम मोडणारे वाहनचालक हे प्रामुख्याने टार्गेट असतील.वाहनचालकाची नंबर प्लेट या लेझर कॅमेऱ्याद्वारे कैद होईल आणि तत्काळ ई-चलान दंड आकारला जाईल. एक ते दोन महिन्यांत याची निविदा प्र्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.