Join us  

उड्डाणासह लँडिंगचा वेग ५ जूनपर्यंत मंदावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 2:01 AM

मुंबईतील छत्रपती आंतरराष्ट्रीय विमानतळ: सिग्नल यंत्रणेच्या कामाचा फटका

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उतरताना मार्गदर्शन करणाºया इन्स्ट्रुमेंट लँडिंग सीस्टिम (आयएलएस) या सिग्नल यंत्रणेमध्ये सुधारणा करून, अद्ययावत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. नवी प्रणाली लागू होईपर्यंत विमानांच्या उड्डाणांचा व लँडिंगचा वेग खालावणार असल्याने, ५ जूनपर्यंत मुंबई विमानतळावरील हवाई वाहतूक धिमी राहण्याची शक्यता आहे. या संदर्भात पायलटना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्याची माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.गुरुवारी मध्यरात्रीपासून ही यंत्रणा सुधारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आयएलएस प्रणालीच्या साहाय्याने विमान उतरवत असताना, ८०० ते १,००० मीटर उंचीवर विमान असताना धावपट्टी पाहून विमान उतरविणे शक्य होत असे. मात्र, नवीन प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सध्या तांत्रिक काम सुरू असल्याने, जुन्या प्रणालीचा वापर करून विमान उतरविण्यासाठी किमान २,४०० ते ३,००० मीटर उंचीवर असल्यापासून पायलटला विमान उतरविण्यासाठी विमानाची गती कमी करावी लागत आहे. त्यानंतर, लँडिंग गिअरचा वापर सुरू करावा लागत आहे.विमान उतरविण्यासाठी विमानाचा वेग पूर्वीपेक्षा कमी करावा लागत असल्याने, दोन विमानांमधील अंतर कायम ठेवण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. त्यामुळे विमान उड्डाण व विमान लँडिंगचा वेग मंदावला आहे. नवीन प्रणाली कार्यान्वित होऊन, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) परवानगी मिळेपर्यंत ५ जूनपर्यंतचा कालावधी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबई विमानतळावर सायंकाळी व सकाळी विमानांचे परिचालन मोठ्या संख्येने होत असल्याने, या काळात वाहतूक धिमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :विमानतळमुंबई