Join us  

आरे कारशेडसाठी जमिनी हडपल्या; आदिवासींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 2:40 AM

आरे कॉलनीतील प्रजापूर येथील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या ७२ वर्षीय बुध्या भोये यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

- अजय परचुरे मुंबई : आरे कॉलनीतील प्रजापूर येथील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या ७२ वर्षीय बुध्या भोये यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. मेट्रो-३ प्रकल्पाच्या आरे कारशेडचे काम सध्या जोरदारपणे सुरू आहे. गुरुवारी मिळालेल्या मंजुरीमुळे तर आता मेट्रोच्या अडचणीही दूर झाल्यात. मात्र या अडचणी खºया अर्थाने भोगाव्या लागतायत ते येथील आदिवासींना. आपली २० गुंठे शेतजमीन भोये कुटुंबीयांनी मेट्रो प्रशासनाला देण्यास स्पष्ट नकार दिलेला असतानाही. मेट्रो प्रशासनाने जबरदस्तीने त्यांच्या जमिनीवर कारशेडचे काम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आपल्या हक्काच्या जमिनीवर जाण्यास भोये कुटुंबीयांना जागा नसल्याने सध्या त्यांच्या सर्व कुटुंबीयांना रोजगाराचं कोणतीही साधन उरलेलं नाही.मेट्रो-३ प्रकल्पातील कारशेड आणि मेट्रो स्थानकासाठी आरेतील जमिनीसह आदिवासींच्या जमिनीही ताब्यात घेत त्यांचं पुर्नवसन केलं जाणार आहे. बुध्या भोये यांनीही आपली जमीन देण्यास मेट्रो प्रशासनास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जमिनीवरून मेट्रो प्रशासन न्यायालयात गेले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र एमएमआरसीने निकाल लागलेला नसतानाही बेकायदेशीररीत्या भोयेंच्या जमिनीवर जबरदस्ती काम सुरू केले आहे. तसेच भोये कुटुंबीयांची अडचण होऊ नये म्हणून त्यांच्या जमिनीच्या चारही बाजूंनी आणि त्यांच्या घराच्या चारही बाजूंनी मेट्रोच्या कॉन्ट्रॅक्टरने पत्रे लावले आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शेतात जाण्याससुद्धा अडचणी होेत आहेत, अशी माहिती सेव्ह आरे संस्थेच्या सदस्या अमृता भट्टाचार्य यांनी लोकमतशी बोलताना दिली. भोये कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी आपल्या २० गुंठे जमिनीवर आंबा, पेरू, ही फळे आणि कारली, भेंडी, दोडकी अशा भाज्यांची लागवड करतात. जमिनीवर कब्जा केल्याने आता आम्ही जगायचं तरी कसं, असा प्रश्न आशा भोये यांनी लोेकमतशी बोलताना केला.>न्यायदेवतेवर विश्वासहे काम आम्ही कायदेशीररीत्या करत असून, आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत़ सर्व परवानग्या आम्ही घेतलेल्या आहेत, असे एमएमआरसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, एमएमआरसीए खोटे बोलत असून, सोमवारी २४ सप्टेंबरला उच्च न्यायालयात आमच्या याचिकेवर सुनावणी असून, आम्ही सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करू, असे आशा भोये यांनी सांगितले़