Join us

अरेरे!... झाडांवरील लाखोंचा खर्च मातीत; आरेत देखभालीअभावी रोपे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 11:07 IST

एमएमआरसीकडून प्रतिझाड २ लाख खर्चाची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गोरेगावच्या आरे परिसरात गेल्या वर्षी लावलेली अनेक झाडे देखभाल न झाल्याने उन्हाच्या तडाख्यात करपून गेली आहेत. विशेष म्हणजे एमएमआरसीने देखभालीसाठी येथील प्रति झाडासाठी दोन लाख रुपयांचा खर्च करण्याचे जाहीर केले होते. मात्र, हे पैसे अक्षरशः मातीत गेल्याची खंत स्थानिक नागरिक आणि वॉचडॉग फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे व्यक्त केली आहे. सध्या शिल्लक असलेल्या झाडांच्या देखभालीसाठी योग्य यंत्रणा उभारण्याची विनंतीही त्यांनी केली.

आरे परिसरात ५८४ झाडांची लागवड करण्यात आली होती. त्यातील गावदेवी मंदिरासमोरील युनिट क्रमांक ४ येथील झाडांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथे पाण्याची व्यवस्था होत नसल्याने या झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत मेट्रो ३ या मार्गिकेवरील स्थानक परिसरामध्ये २९३२ झाडांची लागवड होणार होती. यासाठी १२ कोटी रुपयांना तीन कंत्राटे देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक झाडाच्या देखभालीसाठी ४१ हजार रुपये खर्च होणार असल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात रोपण केलेल्या झाडांची संख्या कमी असल्याने प्रतिझाड २ लाख रूपये खर्च करूनही ही झाडे दुर्लक्षित झाल्याचा आरोप होत आहे.

पावसाच्या भरवशावर वृक्ष लागवड मोहीम

या परिसरात ऑगस्ट २०२४ मध्ये वृक्ष लागवड झाल्यानंतर सप्टेंबरपर्यंत पावसाचे पाणी मिळाले. मात्र, त्यानंतर कोणतेही पाणी देण्यात आले नाही. परिणामी, अनेक झाडे मरणासन्न अवस्थेत असून, वनीकरणाच्च्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला असल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनच्या निकोलस अल्मेडा यांनी केला आहे.

देखरेख यंत्रणा हवी

आरेचे पर्यावरणीय महत्त्व आणि हरित उपक्रमांना कायम ठेवण्याची गरज लक्षात घेता, वर्षभर झाडांना नियमित पाणी देण्याचे वेळापत्रक निश्चित करून आणि वृक्षारोपणाच्या वाढीचे मूल्यांकन करण्यासाठी एक देखरेख यंत्रणा एमएमआरसीएलने तैनात करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच लागवड केलेल्या झाडांच्या देखभालीसाठी आणि झाडे करपल्याबाबत संबंधित एजन्सीला जबाबदार धरावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

टॅग्स :आरे