Join us  

टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 1:33 AM

या औषधांमधील टोसिलीझुमॅबचा तुटवडा असल्याची माहिती ऑल इंडिया फूड अ‍ॅण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनने दिली.

मुंबई : टोसिलीझुमॅब, रेमडेसिवीर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, इटॉलिझुमॅब यांसारख्या औषधांमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते. त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. गंभीर रुग्णांना ही औषधे संजीवनी ठरली आहेत. त्यामुळे या औषधांना मोठी मागणी आहे. मात्र या औषधांमधील टोसिलीझुमॅबचा तुटवडा असल्याची माहिती ऑल इंडिया फूड अ‍ॅण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनने दिली.मुंबईत टोसिलीझुमॅबसारख्या औषधांना मोठी म्हणजे दिवसाला किमान ५०० इंजेक्शनची मागणी असल्याचे आॅल इंडिया फूड अ‍ॅण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांपासून या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. केवळ मुंबई, ठाणे, पुणे येथेच नाही तर हे औषध संपूर्ण राज्यात कुठेही उपलब्ध नाही. पांडे यांनी या औषधाची निर्मिती करणाऱ्या काही नामवंत कंपन्यांमधून माहिती घेतल्यानंतर ही बाब समोर आली. सरकार कितीही दावे करत असले तरी या औषधाचा तुटवडा आहे ही वस्तुस्थिती आहे. यामुळे गरजू रुग्णांची फरपट होत असून सरकारने आणखी काही कंपन्यांना औषधनिर्मितीची परवानगी देणे गरजेचे आहे, शिवाय शेजारील देशांमधूनही औषधे निर्यात करण्याची परवानगी द्यायला हवी, असे पांडे म्हणाले.>काळाबाजार होण्याची भीतीटोसिलीझुमॅब इंजेक्शन साधारण ४० हजार रुपयांना मिळते. गेल्या महिन्यात ते लाखो रुपयांना विकले जात होते. सरकारचे निर्देश तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई केल्यानंतर काही प्रमाणात या औषधाच्या काळाबाजाराला चाप बसला होता. मात्र आता तुटवडा निर्माण झाल्याने पुन्हा एकदा काळाबाजार सुरू होण्याची शक्यता असल्याची भीती फाउंडेशनने व्यक्त केली.