Join us  

कुर्ला एसटी आगारात बायोडिझेल पंप सज्ज, एक महिना प्रायोगिक तत्त्वावर होणार चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:25 AM

कुर्ला आगारात खासगी कंपनीतर्फे बायोडिझेल पंपची उभारणी करण्यात आली आहे. कुर्ला आगारातून सुटणा-या एसटी बसमध्ये बायोडिझेल वापरण्यात येणार आहे.

महेश चेमटे मुंबई : कुर्ला आगारात खासगी कंपनीतर्फे बायोडिझेल पंपची उभारणी करण्यात आली आहे. कुर्ला आगारातून सुटणा-या एसटी बसमध्ये बायोडिझेल वापरण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यासाठी बायोडिझेल वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कुर्ला आगारातून चाचणीस सुरुवात होणार आहे. महामंडळाचा आर्थिक तोटा वाढत जात आहे. यामुळे तोटा कमी करण्यासाठी महामंडळ विविध खर्चांवर पर्याय शोधत आहे. राज्यभरात ४ हजार मार्गांवर १६ हजार एसटी बसेस रोज धावतात. यासाठी लाखो लीटर डिझेल लागते. जून महिन्यात खासगी कंपनीतर्फे जैवइंधन वापरण्याचा प्रस्ताव महामंडळाला सादर करण्यात आला होता. परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.कुर्ला नेहरूनगर आगारामध्ये चाचणीसाठी बायोडिझेल पंप उभारण्यात आला आहे. निवडक मार्गांवरील एसटीमध्ये बायोडिझेल वापरण्यात येणार आहे. कुर्ला नेहरूनगर पंपातील चाचणी ही प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. एक महिना ही चाचणी सुरू राहणार असल्याचे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे. बायोडिझेलची प्रत्यक्ष चाचणी केव्हा सुरू होईल, याची माहिती एसटी प्रशासनाला विचारली असता, खासगी कंपनीच्या सोईने चाचणीची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. वनस्पती तेलापासून इंधनाची निर्मिती केल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. सध्या उपलब्ध असलेल्या इंधनापेक्षा हे इंधन स्वस्त आहे. एसटीच्या गाड्यांमध्ये असलेल्या इंजिनमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल करण्याची गरज नाही. शिवाय सध्या वापरात असलेल्या डिझेलसह बायोडिझेल एकत्र करून वापरल्यास, गाडीच्या इंजिनमध्ये कोणताही बिघाड होणार नाही. एसटीची मागणी खूप मोठी असल्याने, ती पूर्ण करण्यात येणार आहे, असे बायोडिझेल पुरविणाºया कंपनीने स्पष्ट केले आहे.