Join us  

कुर्ला-शीवमधील धोकादायक पूल पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 5:15 AM

कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान धोकादायक बनलेला ६३ वर्षे असलेला जुना पादचारी पूल शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. या पाडकामासाठी दोन १४० टन वजनी क्रेनचा वापर करण्यात आला.

मुंबई -  कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान धोकादायक बनलेला ६३ वर्षे असलेला जुना पादचारी पूल शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. या पाडकामासाठी दोन १४० टन वजनी क्रेनचा वापर करण्यात आला. नियोजित वेळेपेक्षा एक तास आधी काम पूर्ण झाल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.शनिवारी रात्री साडेअकरा ते रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत पुलाच्या पाडकामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेने १४० टन वजनी २ क्रेन, १०० कर्मचारी, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. याजागी लवकरच नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. पुलाच्या कामांसाठी ६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, मध्य रेल्वेने ५ तासांमध्ये हे काम नियोजित वेळेपेक्षा एक तास आधी पूर्ण करून, मेल-एक्स्प्रेसची वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.पूल लवकरात लवकर बांधा- हे पूल पाडल्यामुळे स्थानिक नागरिकांना पर्यायी वापर म्हणून चुनाभट्टी फाटक किंवा कसाईवाडा-आंबेडकर चौक पुलाचा वापर करावा लागत आहे. हे दोन्ही पूल लांबच्या अंतरावर असल्यामुळे चुनाभट्टीतील स्वदेशी मिल येथील रहिवाशांना मोठा वळसा घालून कुर्ला पश्चिमेकडे जावे लागत आहे.- परिणामी, स्थानिक रेल्वे क्रॉसिंगचा वापर करतात़ क्रॉसिंग करताना २३ मे रोजी रात्री १० वाजताविनित माने या युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर पूल बांधावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. जेणेकरून अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत.- या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात कुर्ला पश्चिमेकडील एलबीएस मार्ग, तकिया वॉर्ड, सर्वेश्वर मंदिर मार्ग, परीघ खाडी, चुनाभट्टीतील कसाईवाडा आणि स्वदेशी मिल विभागातील रहिवाशी करतात.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकलबातम्या