Join us  

Nawab Malik vs Sameer Wankhede: आता क्रांती रेडकरनं समीर वानखेडेंच्या शाळेचं प्रमात्रपण पुढे आणलं; मलिकांना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 10:21 PM

मलिकांच्या वकिलांनी कोर्टासमोर अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या शाळेचं प्रमाणपत्रही मलिकांकडून सादर करण्यात आले आहे

मुंबई – समीर वानखेडे(Sameer Wankhede) आणि नवाब मलिक(Nawab Malik) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मुंबई हायकोर्टात मलिक विरुद्ध वानखेडे हे प्रकरण चांगलेच गाजतंय. त्यात दोन्ही बाजूचे वकील आपली बाजू ठामपणे मांडण्यासाठी ना केवळ कागदपत्रांचा हवाला देतात तर संधी मिळताच दोघंही एकमेकांविरोधात कडक शब्दात टिप्पणी करत आहेत.

त्यातच समीर वानखेडेंचे वकील अरशद शेख यांनी ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडताना तुम्ही आम्हाला कुठल्याही नावानं हाक मारा परंतु दाऊद नाही. नवाब मलिकांच्या वकिलांकडून सातत्याने समीर वानखेडे कुटुंब मुस्लीम असून स्वत:ला अनुसुचित जातीतलं असल्याचं सांगत नोकरी लाटल्याचा आरोप करत आहेत. त्यात मलिकांच्या वकिलांनी कोर्टासमोर अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या शाळेचं प्रमाणपत्रही मलिकांकडून सादर करण्यात आले आहे. सेंट जोसेफे हायस्कूलमधील प्रवेश फॉर्म असून त्यावर समीर वानखेडेंचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असल्याचं दाखवलं आहे.

परंतु वानखेडे यांच्या वकिलांकडून मलिकांच्या कागदपत्रावर प्रश्नचिन्हं उभे केले आहे. समीर वानखेडेंच्या वडिलांनी खूप वर्षापूर्वीच मुलाचं नाव बदललं होतं. समीरच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांना दाऊद संबोधित करु नये. वकिलांनी पोलिसांवरही प्रश्न उभे केले. जी कागदपत्रे पोलिसांना सोपवली. ती नवाब मलिकांकडे कशी आली? त्यावर न्या. जामदार यांनी मत मांडत शाळा दर ५ वर्षांनी त्यांचा रेकॉर्ड नष्ट करते परंतु इतकी वर्षी ही कागदपत्रे शाळेने सांभाळली असं म्हटलं. नवाब मलिकांच्या टीमकडून नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडेंनी बनावट जातीचा उल्लेख केला असा आरोप केला त्यावर वानखेडेंच्या वकिलांनी खिल्ली उडवत ५ वीत असताना समीर वानखेडे ते IRS होणार माहिती होतं. त्यामुळे महार जातीचं प्रमाणपत्र बनवण्याची गरज पडली असं म्हटलं.

कोर्टाने दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेत यावर २२ नोव्हेंबरला निर्णय देणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचसोबत आता आणखी कुठलीही कागदपत्रे जमा करू नका असं कोर्टाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही मलिकांच्या आरोपाला उत्तर देत समीर यांचं शाळेतील प्रमाणपत्र शेअर केले आहे. क्रांती म्हणते की, समीर वानखेडेंची बदनामी करण्यासाठी काही वाईट विचारांच्या लोकांनी अर्धवट माहिती समोर आणली. १९८९ मध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत तेव्हाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि आत्ताही सत्य प्रत केली आहे. असं सांगत क्रांतीनं समीर वानखेडेंचे शाळेतील प्रमाणपत्र शेअर केले त्यात समीर ज्ञानदेव वानखेडे आणि महार जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.

टॅग्स :क्रांती रेडकरनवाब मलिकसमीर वानखेडे