ठाणे : महायुती आणि आघाडी तुटल्याचे परिणाम ठाण्यातील इतर मतदारसंघांवर ठामपणे उमटण्याची चिन्हे जरी निर्माण झाली असली तरीदेखील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठी शिवसेनेने आखलेली व्यूहरचना यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस, मनसे, भाजपासह राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार न दिल्यानेही त्याचा फायदा शिवसेनेला होण्याची चिन्हे आहेत. भाजपाने येथे तुल्यबळ उमेदवार न दिल्याने त्याचा फायदा सेनेला होऊ शकेल.कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात आजघडीला ३ लाख ४७ हजार ३८२ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ९१ हजार ९२२ पुरुष आणि स्त्री मतदारांची संख्या ही, १ लाख ५४ हजार ३३७ असून ११२१ मतदारांची संख्या वाढली आहे. या मतदारसंघात परप्रांतीयांची मते सुमारे ६० टक्क्यांच्या आसपास आहेत. मराठी मते ४० टक्क्यांच्या आसपास आहेत. त्यामुळे या मतांवरच सर्वांच्या नजरा खिळून आहेत. या मतदारसंघातून ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी शिवसेनेकडून पुन्हा एकनाथ शिंदे, काँग्रेसकडून मोहन तिवारी, भाजपाकडून संदीप लेले, राष्ट्रवादीकडून बिपिन महाले आणि मनसेच्या वतीने सेजल कदम या रिंगणात आहेत. परंतु, खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजपामध्ये रंगणार आहे. परप्रांतीयांची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने येथे मोहन तिवारी यांना मैदानात उतरविले आहे. भाजपाचे संदीप लेले यांनी मागील निवडणुकीच्या वेळेससुद्धा एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. परंतु, युती असल्याने अखेर त्यांना अर्ज मागे घ्यावा लागला होता. यंदा मात्र युती तुटल्याने लेले हे एकनाथ शिंदे यांच्याशी थेट लढत देण्यासाठी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढलेले राजन गावंड यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केल्याने त्याचा किंचित परिणामदेखील मतांवर होण्याची शक्यता आहेत. गावंड यांना मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकांची मते मिळाली होती. आता ते भाजपामध्ये आले तरी त्यांना मागील वेळी मिळालेली सगळी मते भाजपाच्या पारड्यात जातीलच असे नाही. दरम्यान, भाजपानेसुद्धा येथील परप्रांतीयांच्या मतांवर डोळा ठेवून काही दिवसांपूर्वी इंदिरानगर नाक्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची सभा टेम्पोत घेऊन येथील मतदात्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, सिंह वगळता येथे एकाही स्टार प्रचारकाची सभा या मतदारसंघात झालेली नाही. त्यामुळे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार, हे सांगणे सध्या तरी कठीण झाले आहे. राष्ट्रवादीनेसुद्धा या मतदारसंघाला फारसे महत्त्व दिल्याचे दिसून येत नाही. अनेक नामवंत चेहरे राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा डॉक्टर सेलच्या अध्यक्षाला म्हणजेच बिपिन महाले यांना तिकीट देऊन राष्ट्रवादीने कोणती खेळी केली, याबाबत मात्र अद्याप उत्तर मिळू शकले नाही. दुसरीकडे मनसेनेसुद्धा येथे नव्या चेहऱ्याला संधी देऊन सेजल कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. विशेष म्हणजे गावंड हे भाजपामध्ये गेल्याने मनसेची बाजू येथे कमकुवत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातही येथील परप्रांतीयांच्या मतांचा टक्कादेखील त्यांना पोषक नाही. अशा स्थितीत त्या कोणती कामगिरी बजावतील हा प्रश्न आहे. एकूणच आता काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदींनी येथे कमकुवत उमेदवार दिल्याने येथे सेनेला बाय मिळाल्यासारखी चिन्हे दिसत आहेत. (प्रतिनिधी)
कोपरी-पाचपाखाडीचा गड शिवसेना राखण्याची चिन्हे?
By admin | Updated: October 14, 2014 23:17 IST