Join us  

मत्स्य व्यवसायाचा वादळी दुष्काळ; अभ्यास गट समिती स्थापन करण्याची कोळी महासंघाची मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: September 21, 2022 10:29 AM

बदलत्या वातावरणात मागील सहा वर्षांपासून मासेमारीच्या ऐन हंगामात मुसळधार पाऊस, तुफानी लाटा सोसाट्याचा वारा, वादळ हे  नित्याचेच झाले आहे आणि याचा परिणाम मत्स्य संसाधनांवर, मत्स्य साठ्यांवर होऊन, ते मत्स्यसाठ्ये स्थलांतरित होत आहेत

मनोहर कुंभेजकर

मुंबई - भारताच्या पश्चिम किनाऱ्या वरील पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत संपल्यानंतर एक ऑगस्टपासून मासेमारी सुरू झाली. मात्र महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सुरू झालेला मासेमारी हंगाम पुन्हा एकदा पावसाळी आणि वादळी वातावरणात सापडला आहे. त्यामुळे पारंपारिक मासेमारी नुकसानीत गेली असल्याने मत्स्य व्यवसायाचा वादळी दुष्काळाची मागणी मच्छीमार करीत आहे. उधार उसनवारी करून मोठ्या जय्यत तयारीने मासेमारीसाठी निघालेला कोळी समाज महिन्याभरानंतर देखील मासेमारी नीट करू शकला नसल्याने खिशातले घालवून उपाशीच राहिले असल्याने संपूर्ण राज्याच्या किनारपट्टीवरील मासेमारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असणाऱ्या कोळी समाजाला उदरनिर्वाहाची हमी मिळावी म्हणून, नित्यनेमाने येणारी वादळे, सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस आणि सागरी मत्स्य साठ्यांवर होणारा परिणाम, मासेमारी करण्यास जाऊ नये असे मिळणारे आदेश त्याबरोबर मासळीला मिळणारा दर व मासे मर्तुकीवर होणारा खर्च या बाबींचा अभ्यास करून मासेमारांना भरपाई करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी मत्स्य शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी व जाणकार मच्छीमार यांची अभ्यास गट समिती गठित करावी अशी मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी केली आहे.

बदलत्या वातावरणात मागील सहा वर्षांपासून मासेमारीच्या ऐन हंगामात मुसळधार पाऊस, तुफानी लाटा सोसाट्याचा वारा, वादळ हे  नित्याचेच झाले आहे आणि याचा परिणाम मत्स्य संसाधनांवर, मत्स्य साठ्यांवर होऊन, ते मत्स्यसाठ्ये स्थलांतरित होत आहेत या कारणास्तव मासेमारी नौका समुद्रात असूनही मासेमारी करू शकल्या नाही. मासेमारीचा हंगाम सुरू होऊन  महिना उलटला असला तरी मासेमारी करण्यासाठी मिळालेला अवधी अवघा तुटपुंज आहे,

 मासेमारी साधनांवरील वाढते दर, सतत माहगणारे डिझेल त्याचबरोबर मिळालेली मासळी आणि माशांच्या दरामध्ये असलेली तफावत यामुळे राज्यातील मच्छीमार संपूर्णतः आर्थिक दृष्ट्या नुकसानीत गेला आहे. ११ हजार यांत्रिकी मासेमारी नौका आणि तीन हजार बिगर यांत्रिकी मासेमारी नौकां द्वारे मासेमारी करणारा वर्ग, नौका धारक कुटुंबीय, मच्छीमार आणि या व्यवसायावर अवलंबून असणारा मासळी विक्रेत्या आणि प्रक्रिया करणारा वर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला असल्याची माहिती राजहंस टपके यांनी दिली.

टॅग्स :मच्छीमार