Join us  

पितृपक्षात काकस्पर्श झाला दुर्मीळ!

By admin | Published: September 21, 2014 11:51 PM

चांगल्या प्रकारे विकसित झालेला औद्योगिक पट्टा म्हणून रसायनी परिसराचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी उद्योगधंद्यांबरोबरच नागरीकरणातही झपाट्याने वाढ झाली खरी

राकेश खराडे, मोहोपाडाचांगल्या प्रकारे विकसित झालेला औद्योगिक पट्टा म्हणून रसायनी परिसराचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी उद्योगधंद्यांबरोबरच नागरीकरणातही झपाट्याने वाढ झाली खरी, मात्र पाताळगंगेचे पाणी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील समृद्ध वनसंपदा धोक्यात आली असल्याचे येथे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. धार्मिक विधी कार्यात ज्या पक्षांना स्थान देण्यात आलेले आहे, असे पक्षीही आता दिसेनासे झाले आहेत. पितृपक्षात महत्त्व प्राप्त झालेले कावळे तर दिसणेही सध्या दुर्मीळ झालेले आहेत.सध्या पितृपक्ष सुरू असल्याने पुण्यतिथीला आलेले नातेवाईक कावळ्याने पिंडाला स्पर्श करावा म्हणून वाट पाहत बसल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. गुळसुंदे येथील यादवकालीन सिद्धेश्वर मंदिरासमोरील वाहणाऱ्या पाताळगंगा नदीवर दशक्रिया विधी होत असतात. विधी करण्यासाठी आलेल्या मृतांच्या नातेवाईकांचा पाहिलेला प्रसंग अगदी बोलका होता. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जीवन-मरणाच्या चक्रात कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशाच एका व्यक्तीच्या दशक्रिया विधीसाठी असलेली माणसे भाताच्या पिंडाला कावळ्याने स्पर्श करावा या प्रतीक्षेत बसली होती. बराचवेळ होवूनही कावळा काही पिंडाला स्पर्श करीत नव्हता. कावळे असतील तर ते येणार, परंतु नातेवाईक वाट पाहत होते. अनेक विनंत्या करूनही कावळा न आल्याने सारेच कंटाळले. कावळा पिंडाला शिवला नाही तर मृत व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो, अशी हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे. सध्या परिसरात प्रकर्षाने कावळ्यांची उणीव जाणवू लागल्याने मंगळवार २३ सप्टेंबरच्या अमावस्या श्राद्धाच्या पिंडाला कावळ्यांचा स्पर्श होतो की नाही? याकडे रसायनीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, पिंपळ, वड, चिंच आदि झाडांवर कावळ्यांचे वास्तव्य असायचे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास शहरातून कावळे आणि चिमण्या हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. सकाळ झाल्यावर घोळक्याने परिसरात, घरादाराच्या खिडक्यांवर, पारांवर दिसणारे कावळे आता क्वचितच दिसून येतात.