Join us  

मुंबईतील खुन्याला केली अटक

By admin | Published: January 12, 2017 4:02 AM

पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडीतील महंमद उर्फ कांडी याचा खून करणाऱ्या

ठाणे : पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून मुंबईच्या शिवाजीनगर, गोवंडीतील महंमद उर्फ कांडी याचा खून करणाऱ्या चांद रमजानअली खान (२७, रा. शिवाजीनगर) याला, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उल्हासनगर भागातून अटक करून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.गोवंडी भागातील रहिवासी चांदचा मित्र चिंका उर्फ महंमद खलील उल्ला शबीर कुरेशी (२८) याचे महंमद ताहीर उर्फ महंमद कांडीबरोबर भांडण झाले होते. याच भांडणातून चिंका, चांद, मोनू आणि फयाज या चौघांनी १३ डिसेंबर २०१६ रोजी रात्री गोवंडीतील मातीच्या ढिगाऱ्याजवळ गोळीबार करून महंमद यास ठार केले होते. १४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वा.च्या सुमारास त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्या आधारे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्याच दिवशी चिंकाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमाशंकर ढोले यांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर, चांद हा त्याच्या साथीदारांसह पसार झाला होता. त्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या सोनसाखळी चोरीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती. त्याच्याविरुद्ध २०१२ मध्ये हाणामारीचा, तर २०१५ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचाही गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)वादाचे तत्कालीन कारण : या खुनाला १३ डिसेंबरचा वाद हे तत्कालीन कारण असले, तरी चिंकाच्या पत्नीबरोबर महंमद याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यातूनच त्याने चांद, मोनू आणि फयाज या इतर तीन साथीदारांच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार, गोळीबार करून त्याचा खून केल्यानंतर हे चौघेही जण पसार झाले होते. त्यातील दोघांना आता अटक झाली असून, मोनू आणि फयाज या दोघांचा अद्यापही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.