कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 02:19 AM2019-07-11T02:19:43+5:302019-07-11T06:58:54+5:30

शिवकुमार यांना ताब्यात घेत पुन्हा बेंगळुरूला पाठविण्यात आले होते.

Karnataka's rebel MLA returned to Bengaluru overnight from mumbai; Why? | कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला

कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट? एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला

Next

बेंगळुरु : कर्नाटकमधीलकाँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मुंबईत आश्रय घेतला आहे. गेल्या तीन दिवसांत नाट्यमय घडामोडींनंतर यापैकी एक आमदार रातोरात बेंगळुरुला परतला असून पुन्हा मुंबईला जाणार नसल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे. तसेच अद्याप काँग्रेसचाच असल्याने बेंगळुरुतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 


दरम्यान, आज कर्नाटक काँग्रेसचे ब्रेन म्हणून ओळखले जाणारे डी के शिवकुमार हे या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी मुंबईला आले होते. मुंबईतील रेनेसन्स हॉटेलमध्ये हे आमदार आश्रयाला असून त्यांनी शिवकुमार यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे पत्र मुंबई पोलिस आयुक्तांना देत संरक्षण मागितले होते. यामुळे मुंबई पोलिसांनी हॉटेल परिसरात 144 कलम लागू करत शिवकुमार यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला होता. तर गृहनिर्माणमंत्री एम.बी.टी. नागराज व आमदार के. सुधाकर यांनी आज विधानसभाध्यक्षांकडे राजीनामे दिल्याने, सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडलेल्या आमदारांची संख्या १६ झाली.


सुमारे सहा तास चाललेल्या या नाट्यानंतर शिवकुमार यांना ताब्यात घेत पुन्हा बेंगळुरूला पाठविण्यात आले होते. यावर शिवकुमार यांनी मुंबई ही आदरातिथ्यासाठी ओळखली जाते.  रेनेसन्स हॉटेलमध्ये माझ्या नावाने रूम आरक्षित आहे. मी माझ्या कामासाठी मुंबईत आलो आहे. माझ्या मित्रांना, सहकाऱ्यांना भेटण्यासाठी मी मुंबईत आलो होतो. मात्र, भाजपा आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. हे लज्जास्पद आहे, अशी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसचे आमदार हे माझे मित्र आहेत. त्यांनी आणि मी एकाच काळात राजकीय क्षेत्रात जन्म घेतला आहे. त्यांच्या जिवाला कसा काय धोका उत्पन्न करू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. 




या नाट्यानंतर बुधवारी रात्री उशिरा हॉटेलात असलेले काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि बेंगळूरु विकास महामंडळाचे अध्यक्ष एस टी सोमशेखर यांनी रातोरात विमान पकडत बेंगळुरु गाठले आहे. यासाठी त्यांनी गुरुवारी सकाळी महामंडळाची बैठक असल्याचे कारण दिले आहे. 




मध्यरात्रीनंतर सोमशेखर बेंगळुरुमध्ये पोहोचले असून त्यांनी आपण इथेच राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मुंबईला परत जाणार नसून आमदारकीचा राजीनामा दिला असला तरीही काँग्रेसमध्येच असल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडींमुळे बंडखोर आमदारांमध्ये फूट पडली की शिवकुमार यांना मुंबई दौऱ्यात यश आले, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 



काय नाटक सुरू आहे काहीच थांगपत्ता लागेना....
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीपासूनच सत्तेचे नाटक सुरू झाले आहे. 13 आमदारांनी बंडखोरी करत आमदारकीचाच राजीनामा दिल्याने शेवटी त्यांना खूश करण्यासाठी कुमारस्वामींच्या मंत्रिमंडळानेच राजीनामा दिला आहे. मात्र, तरीही कर्नाटकच्या बेंगळुरुतील विधानसौध आवारात 11 ते 14 जुलैदरम्यान 4 पेक्षा अधिक व्यक्ती समूहाने फिरू शकत नसल्याचे 144 कलम लागू करण्यात आले आहे. शिवाय कुमारस्वामींनी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठकही बोलावली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे पक्षाच्या राज्यातील अध्यक्षांकडे सोपविले आहेत, मुख्यमंत्र्यांकडे नाहीत. यामुळे ते अद्यापही मंत्री आहेत. या आधारावर कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली आहे. 






 

Web Title: Karnataka's rebel MLA returned to Bengaluru overnight from mumbai; Why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.