Join us  

जिनीव्हात रोवला मुंबई ग्राहक पंचायतीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 5:34 AM

स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेत भारतातील मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेने अलौकिक आणि सर्व भारतीयांना अभिमानास्पद अशी कामगिरी करून दाखवली आहे.

स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेत भारतातील मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेने अलौकिक आणि सर्व भारतीयांना अभिमानास्पद अशी कामगिरी करून दाखवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित ग्राहक संरक्षणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची जगातील सर्व सदस्य राष्ट्रे व्यवस्थित अंमलबजावणी करत आहेत का हे बघण्यासाठी एक कायमस्वरूपी देखरेख यंत्रणा हवी, अशी आग्रही मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. शिरीष देशपांडे यांनी केली होती. तीन वर्षांच्या सविस्तर चर्चेनंतर सर्वसहमतीने त्यांची ही मागणी मान्य झाली. मुंबई ग्राहक पंचायतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. मुंबई ग्राहक पंचायतीची संयुक्त राष्ट्राच्या एका व्यासपीठावरील ही ऐतिहासिक व कायमस्वरूपी कामगिरी सर्व भारतीयांना स्फूर्तिदायी व अभिमानास्पद असतानाच यानिमित्ताने ‘कॉफी टेबल’ या सदरांतर्गत अ‍ॅड. शिरीष देशपांडे आणि अनुराधा देशपांडे यांची ‘लोकमत’चे प्रतिनिधी मनोहर कुंभेजकर यांनी घेतलेली ही मुलाखत वाचकांसाठी.जिनीव्हा येथील जागतिक ग्राहक संरक्षण परिषदेबाबत काय सांगाल?गेल्या ९-१० जुलै रोजी संयुक्त राष्ट्रांच्या ग्राहक संरक्षणविषयक तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्याचा मान मुंबई ग्राहक पंचायतीला मिळाला. २०१६ पासून दरवर्षी आयोजित या वार्षिक ग्राहक संरक्षण परिषदेची मूळ कल्पना मुंबई ग्राहक पंचायतीची. ही कल्पना सर्वप्रथम २०१२ साली मी लंडन-स्थित कंझ्युमर्स इंटरनॅशनलच्या संचालक मंडळावर निवडून गेल्यावर मांडली व त्यानंतर जिनिव्हा येथे मांडली. संयुक्त राष्ट्रांच्या १९८५ मध्ये अस्तित्वात आलेल्या ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदलत्या कालानुरूप सुधारणा करण्याचा आग्रह मी धरला होता.सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीबाबत काय सांगाल?सुधारित मार्गदर्शक तत्त्वांची संयुक्त राष्ट्रांतील सर्व सदस्य राष्ट्रे व्यवस्थित अंमलबजावणी करत आहेत का हे बघण्यासाठी एक कायमस्वरूपी देखरेख यंत्रणा हवी, असा माझा आग्रह होता. यावर १० देशांचा एक कार्यकारी गट स्थापन करण्यात येऊन आमच्या या प्रस्तावावर सविस्तर अहवाल मागवण्यात आला. जिनीव्हा येथे सतत तीन वर्षे त्यावर सविस्तर चर्चा झाल्या. त्यात या मार्गदर्शक तत्त्वांत अनेक सुधारणा करण्याचे सर्व सहमतीने मान्य करण्यात आले. परंतु मुंबई ग्राहक पंचायतीच्या कायमस्वरूपी देखरेख यंत्रणेच्या सूचनेला मात्र अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी इ. प्रगत राष्ट्रांनी शेवटपर्यंत विरोध केला.मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब कसे झाले?ग्राहक पंचायतीने चिकाटीने, भारत सरकारच्या ग्राहक मंत्रालयाच्या आणि ब्राझील व अन्य विकसनशील देशांच्या मिळवलेल्या पाठिंब्यामुळे सरतेशेवटी मुंबई ग्राहक पंचायतीचा हा बहुचर्चित कायमस्वरूपी देखरेख यंत्रणेचा प्रस्ताव त्यांच्या गळी उतरवलाच व संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेने २२ डिसेंबर २०१५ रोजी यावर शिक्कामोर्तबही केले. हा एक मोठा जागतिक व ऐतिहासिक विजय आहे, असे मी अभिमानाने सांगतो.देखरेख यंत्रणेच्या परिषदेचा मूळ उद्देश काय आहे?संयुक्त राष्ट्रांच्या सुधारित ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी विविध राष्ट्रे कशी करत आहेत? त्यात या राष्ट्रांना, विशेषत: विकसनशील व अविकसित राष्ट्रांना, काही साहाय्य/ मार्गदर्शन/ सल्ला हवा असल्यास तो देणे. तसेच विविध राष्ट्रे आपापल्या ठिकाणी ग्राहक संरक्षणाबाबत काही चांगले उपक्रम राबवत असतील तर त्याबाबत माहितीचे आदान-प्रदान करणे हा या देखरेख यंत्रणेच्या परिषदेचा मूळ उद्देश आहे.‘सामंजस्य मंच’ सादरीकरणाबद्दल काय म्हणणे आहे?जिनीव्हा येथील यंदाच्या परिषदेत तक्रार निवारण या सत्रात देशोदेशीच्या प्रस्थापित तक्रार निवारणाच्या खर्चीक व वेळकाढू न्यायालयीन यंत्रणा व पर्यायी विवाद सोडवणूक यंत्रणा यावर अनेक देशांतील तज्ज्ञांनी या क्षेत्रातील उत्तम प्रथांचा वेध घेतला. या सत्रात मी रेरा कायद्याअंतर्गत महारेरामध्ये सामंजस्य मंचाची मुंबई ग्राहक पंचायतीने सुचवलेली अनोखी कल्पना प्रभावीपणे मांडून ती कशी यशस्वीपणे राबवत आहोत याबद्दल सादरीकरण केले. मुळात पर्यायी तक्रार यंत्रणा जगात अनेक देशांत राबवली जात आहे. त्यात नवीन असे काही नाही. परंतु या सर्व ठिकाणी समन्वयक म्हणून जी व्यक्ती विवादातील दोहो बाजूंमध्ये समन्वय/सलोखा घडवून आणते ती व्यक्ती स्वतंत्र व निष्पक्ष असणे आवश्यक असते, असा एक दंडक आहे. परंतु मुंबई ग्राहक पंचायतीचा प्रयोग नेमका याच मुद्द्यावर अनोखा आहे.सामंजस्य मंचाचे कार्य कसे असते?महारेरा अंतर्गत सामंजस्य मंचात दोन समन्वयक असतात. हे दोन्ही प्रतिनिधी स्वतंत्र व निष्पक्ष तर नसतातच, किंबहुना ते विवादातील दोन्ही बाजूंपैकी एकेकाचे प्रतिनिधित्व करून त्या त्या बाजूचे उघड उघड हितरक्षण करणारे प्रतिनिधीच असतात. जगात असा हा प्रयोग कुठे प्रत्यक्षात असल्याचे मला तरी माहीत नाही आणि नेमके यातच महारेराच्या सामंजस्य मंचाचे आगळेवेगळेपण आहे आणि ते आपण जगासमोर मांडू शकलो ही अभिमानाची बाब आहे. सामंजस्य मंचाच्या यशस्वितेचे प्रमाणसुद्धा आम्ही अधोरेखित केले. मुंबई व पुणे येथील ६५ पैकी ५३ प्रकरणांत सामंजस्याने तंटे मिटले असून यशस्वितेचे प्रमाण हे ७९ टक्के होते. सिंगापूरचे यशस्वितेचे प्रमाणसुद्धा ७५ ते ७८ टक्के असल्याचे वाचनात आले होते. अशा प्रकारे सामंजस्य मंचात दोन्ही बाजूंचे हित रक्षणारे प्रतिनिधी घेऊन मुंबई ग्राहक पंचायत व महारेराने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम तर बदललेच, पण त्याही पुढे जाऊन अशा प्रकारच्या नव्या व्यवस्थेद्वारेसुद्धा यश मिळू शकते हे आपण जगाला दाखवून देऊ शकलो. मुंबई ग्राहक पंचायतीची पुस्तिकाही त्यांच्या वेबसाइटवर अपलोड करून ती सर्व जगाला उपलब्ध करून दिली.मुंबई ग्राहक पंचायतीची सुरुवात कशी झाली?१९७५ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बिंदुमाधव जोशी, संगीतकार सुधीर फडके, नगरसेवक मधू मंत्री, अशोक रावत, आप्पासाहेब गोडबोले यांनी अन्नधान्याचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, ग्राहकांवर बाजारपेठेत होणारे अन्याय यातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणून ग्राहकांना संघटित करण्याचा निश्चय केला. त्यासाठी ग्राहक कुटुंबांचे संघ बनवून त्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे रास्त दरात मासिक वाटप करणे हे उत्तम साधन होऊ शकेल, असा विचार करून त्याची अंमलबजावणी दादरच्या वनिता समाज हॉल येथे केली. याचे फलित म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.कार्याबद्दल काय सांगाल?गणपती, दिवाळी या सणांच्या सुमाराला गेली ४० वर्षे मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ग्राहक पंचायत पेठांचे दरवर्षी यशस्वीरीत्या आयोजन केले जाते. दादर, गोरेगाव, अंधेरी, बोरीवली, ठाणे, वसई, पुणे, दापोली, पनवेल या विविध भागांत या ग्राहकपेठांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदा पालघर येथे २२ आॅगस्टपासून पहिल्यांदाच ग्राहक पंचायत पेठेचे आयोजन होत आहे. या ग्राहकपेठांमधून अनेक लघू उद्योजकांना एक व्यासपीठ मिळत असून ग्राहकांना एकाच वेळी एकाच छताखाली वस्तूंची रास्त भावात विक्री या पद्धतीने ग्राहकपेठांचे काम चालते. लघू उद्योजकांना प्रोत्साहन देत त्यांना विक्रीची एक संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.ग्राहकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबही होत आहे?गेल्या ४३ वर्षांत संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी पद्धतीने व सेवाभावी वृत्तीने कार्य केल्यानेच ‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या आमच्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला असून आज स्पर्धेच्या युगातही मुंबई ग्राहक पंचायतीची लोकप्रियता टिकून असून दिवसेंदिवस अनेक नवे ग्राहक संघ सुरू करा, अशी मागणी आमच्याकडे होत आहे. पूर्वी आम्ही ग्राहक संघाची दर महिन्याची यादी सदस्यांना भरून द्यावी लागत होती. आता सध्याच्या डिजिटल युगात आमच्या संस्थेने याद्या मोबाइलवर उपलब्ध करून दिल्या असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबही ग्राहकहितासाठी करायचे ठरवले आहे.आर्थिक उलाढाल कशी होत आहे?ग्राहकपेठेत तयार कपडे, दागिने, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फर्निचर, कंदील, पणत्या, रांगोळ्या, तोरणे, लहान मुलांचे कपडे, भरजरी साड्यांपासून घराचे पडदे, बेडशीट्स, चटई-रजई, फुलदाण्या, गृहसजावट, इमिटेशन दागिने, बॅग-पर्सेस, इतर भेटवस्तू, शर्टपीस-पॅण्टपीस, कुर्ते असे एक ना अनेक प्रकार येथे मिळत असल्याने ग्राहकांची येथे मोठी झुंबड उडते. २०१७ साली तर मुंबई ग्राहक पंचायत पेठेने एकूण ६.५ कोटींची आर्थिक उलाढाल करून विक्रम केला आहे. सुरुवातीला दरमहा १० वस्तूंचे वितरण करणारी संस्था आज वर्षाकाठी ४५० ते ५०० विविध वस्तूंचे वितरण करते. मुंबई, पुणे, वसई-विरार, पालघर, ठाणे, रायगड व रत्नागिरीपर्यंतची सुमारे ३४ हजार कुटुंबे या वितरण व्यवस्थेचा लाभ घेत आहेत. जागृत ग्राहकांना आपल्या तक्रारींचे निवारण करून घेण्यासाठी विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी दहा मार्गदर्शक केंद्रे ठिकठिकाणी कार्यरत आहेत.ग्राहकांना काय सांगाल?उद्योजकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडील वस्तूंचा दर्जा, किमती अशा निकषांच्या आधारे त्यांना स्टॉल दिले जातात. महिला बचतगट, कुष्ठरोगी सेवा समिती, आनंदवन, अंध कलाकारांनी बनवलेल्या वस्तू, निराधार

टॅग्स :मुंबई