Join us  

जमनालाल बजाज फाउंडेशनचे पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 5:46 AM

जमनालाल बजाज फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुरस्कार प्रदान करत गौरव केला जातो. संस्थेचे यंदाचे ४०वे वर्ष असून, यंदा ग्रामीण विकास विज्ञान समितीचे शशी त्यागी, सलाम बालक ट्रस्टच्या संचालिका

मुंबई : जमनालाल बजाज फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुरस्कार प्रदान करत गौरव केला जातो. संस्थेचे यंदाचे ४०वे वर्ष असून, यंदा ग्रामीण विकास विज्ञान समितीचे शशी त्यागी, सलाम बालक ट्रस्टच्या संचालिका डॉ. प्रवीण नायर, अल-अक्सा विद्यापीठाच्या फ्रेंच विभागाचे संचालक डॉ. झियाद मेदुख आणि जन स्वास्थ सहयोग (संस्था) यांना, जमनालाल बजाज फाउंडेशनच्या वेगवेगळ्या विभागातील पुरस्कारांनी गौरविण्यात आले.शनिवारी दुपारी ४ वाजता कुलाबा येथे पार पडलेल्या सोहळ्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी जमनालाल बजाज फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सी. एस. धर्माधिकारी उपस्थित होते. विधायक कार्य विभागामध्ये अभूतपूर्व योगदानाबद्दलचा पुरस्कार ग्रामीण विकास समितीचे सचिव शशी त्यागी यांना प्रदान करण्यात आला.ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याबद्दल छत्तीसगड येथील जन स्वास्थ्य सहयोग या संस्थेला गौरविण्यात आले. महिला आणि बालविकास आणि कल्याणासाठीचा जानकीदेवी बजाज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार, सलाम बालक ट्रस्टच्या संचालिका डॉ. प्रवीण नायर यांना प्रदान करण्यात आला. भारताबाहेर गांधीवादी तत्त्वांचा प्रसार केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अल-अक्सा विद्यापीठाच्या फ्रेंच विभागाचे संचालक डॉ. झियाद मेदुख यांना प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह आणि दहा लाख रुपये असे पुरस्कारांचे स्वरूप आहे.