Join us  

रस्त्यावरील लोखंडी कुंड्या धोकादायक,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 7:21 AM

अंधेरी पश्चिमेकडील सिझर रोड येथील मार्गाच्या मधोमध लोखंडी कुंड्या एप्रिल २०१६मध्ये लावण्यात आल्या होत्या. या कुंड्यामध्ये वृक्षारोपण करून मार्गाचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न झाला,

- सागर नेवरेकरमुंबई : अंधेरी पश्चिमेकडील सिझर रोड येथील मार्गाच्या मधोमध लोखंडी कुंड्या एप्रिल २०१६मध्ये लावण्यात आल्या होत्या. या कुंड्यामध्ये वृक्षारोपण करून मार्गाचे सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न झाला, परंतु सद्यस्थितीत या कुंड्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातील काही कुंड्या गायब झाल्या असून, अनेक कुंड्यांच्या लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हा जनतेच्या पैशांचा गैरवापर असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.सिझर रोड येथील आंबोली मार्गावर एप्रिल २०१६ मध्ये कमल एंटरप्रायजेस या कंत्राटदाराकडून या कुंड्या रस्त्याच्या मधोमध बसविण्यात आल्या. सिझर मार्ग हा मुळातच अरुंद आहे. त्यात या मार्गाच्या मधोमध लोखंडी कुंड्या लावण्यात आल्या. त्यामुळे या मार्गावर सतत अपघात होत आहेत. आता या कुंड्या पूर्णपणे निकामी बनल्या आहेत. कुंड्यांची कोणतीही काळजीदेखील न घेतली गेल्याने रोपेदेखील सुकून गेली आहेत. धोकादायक बनलेल्या काही कुंड्या काढण्याचे काम रात्रीच्या वेळी सुरू आहे. मात्र, त्या काढताना रस्त्यातील लोखंडी खांब पूर्णपणे काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता परिसरातील धोकादायक कुंड्या लवकरात लवकर काढाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक भाजपा आमदार अमित साटम यांच्याशी फोन आणि व्हॉट्स अ‍ॅपद्वारे संपर्क केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक नगरसेविका काँग्रेसच्या अल्पा जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, कुटुंबातील दु:खात व्यस्त असल्याचे त्यांनी कळविले.सगळ्या कुंड्या हटवासिझर मार्गावर जीवघेण्या झाडाच्या कुंड्या लावण्यात आल्या आहेत. मार्ग आधीच अरुंद असल्याने येथे अपघात होत असतात. अपघातादरम्यान एखादी व्यक्ती लोखंडी कुंड्यांवर आदळली, तर तो जीव नक्कीच गमावणार. प्रशासनाने त्वरित याची दखल घेत, सर्व कुंड्या हटवाव्यात. या संदर्भातील माहिती आम्ही माहिती अधिकारातून प्राप्त केलेली आहे, असे रहिवासी शैलेश देसाई यांनी सांगितले.एकाने गमावला पाययेथे दोन दिवसांपूर्वी अपघात झाला आहे. यात व्यक्तीला पाय गमवावा लागला. लोखंडी कुंड्यांबाबत १० ते १५ लोकांनी तक्रारी केल्या आहेत. या मार्गावर दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांचा अपघात होत असतात, असे शिवसेना शाखाप्रमुख हरुन खान यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई