Join us

तपासनीस नाराज, उत्तरपत्रिका तपासायला मिळतो कमी वेळ

By admin | Updated: March 25, 2017 01:46 IST

दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यावर निकालामध्ये होणारे गोंधळ अथवा उशीर टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने तपासनीस

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा झाल्यावर निकालामध्ये होणारे गोंधळ अथवा उशीर टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने तपासनीस आणि पर्यवेक्षकांना दहा दिवसांत उत्तरपत्रिका तपासण्याची मुदत दिली आहे. प्रत्यक्षात मात्र परीक्षकांना पाच किंवा सहाच दिवस मिळतात आणि मिळणारे मानधनही कमी असल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक नाराज आहेत. वस्तुस्थितीचा विचार करूनच बोर्डाने ही मुदत द्यावी या मागणीने आता जोर धरला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र, त्या प्रमाणात शिक्षकांच्या संख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे एका शिक्षकाला एका विषयाच्या सर्वसाधारणपणे ४०० उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात. पाच दिवसांत ४०० उत्तरपत्रिका तपासून पूर्ण करणे शक्य होत नाही. पेपर झाल्यावर दुसऱ्या दिवशी उत्तरपत्रिका पाठवण्याचे काम सुरू होते. या सर्व प्रक्रियेचा विचार करून अवघे पाच किंवा सहाच दिवस मिळतात. या कालावधीत मुदतवाढ करून २० दिवसांची करावी अशी मागणी शिक्षकांतर्फे करण्यात येत आहे. दहावीच्या परीक्षक, मॉडरेटर्सच्या मानधनाचीही बोंबशिक्षण मंडळ १० दिवसांची मुदत देऊन शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून काम करून घेते. पण, मानधनात वाढ केली जात नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तरपत्रिका तपासणीच्या मानधनात वाढ मिळावी म्हणून शिक्षक संघर्ष करीत आहेत. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या तुलनेत दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीला मिळणारे मानधन कमी आहे. एका पर्यवेक्षकाकडे सात तपासनीसांकडून उत्तरपत्रिका तपासण्यासाठी येतात. म्हणजेच एका पर्यवेक्षकाच्या नजरेखालून सर्वसाधारणपणे १ हजार ६०० उत्तरपत्रिका जातात. मात्र, यासाठी त्याला १ हजार ९९० रुपये इतकेच मानधन मिळते. हे मानधन अत्यल्प असल्याचे मत टिचर्स डॅमोकॅ्रटीक फ्रंटचे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले. (प्रतिनिधी)