Join us  

एसएनडीटीतील ‘त्या’ प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:17 AM

कुलगुरूंची माहिती : तक्रारदार विद्यार्थिनीच्या पाठीशी विद्यापीठ प्रशासन ठाम असल्याचे केले जाहीर

मुंबई : एसएनडीटी महिला विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थिनीची सुरक्षा हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. विद्यापीठ प्रशासन तक्रारदार विद्यार्थिनीच्या पाठीशी असून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, असे आश्वासन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन दिले. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी व्यवस्थापन परिषदेत विशेष समितीसाठी प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला आहे. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एसएनडीटी महिला विद्यापीठातील रचना झवेरी या महिला वॉर्डनने अ‍ॅलर्जी झाल्यामुळे स्लीव्हलेस ड्रेस घातलेल्या विद्यार्थिनीला कुठे अ‍ॅलर्जी झाली, हे पाहण्यासाठी जबरदस्तीने अंगावरील कपडे उतरवायला लावल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे. या प्रकरणी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटनांनीही तीव्र निषेध नोंदवला. या पार्श्वभूमीवर आधी ३ सदस्यीय समिती विद्यापीठाकडून नेमण्यात आली. मात्र त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यवस्थापन परिषदेच्या अंतर्गत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत विद्यार्थी परिषदेकडून निवडून आलेला विद्यार्थी, विधि किंवा कायदेविषयक विषयातील प्रतिनिधी म्हणून वकील, समाजसेवी संस्थेतील व्यक्ती, निवृत्त सहायक पोलीस निरीक्षक आणि कुलगुरू पदासाठी उमदेवार प्रतिनिधी अशा प्रत्येकी एक प्रतिनिधीचा समावेश असेल. या प्रतिनिधींच्या वेळेनुसार समिती प्रकरणाची चौकशी करेल. अहवाल लवकरात लवकर मिळावा, अशी आमचीही मागणी असल्याचे वंजारी यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यापीठातील पाण्यामुळे विद्यार्थिनींना त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. मात्र जुहू येथील संकुलात पाणी व खाद्याच्या निर्जंतुकीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याची माहिती वंजारी यांनी दिली. तसेच या प्रकरणानंतर एका कंपनीकडूनही पाण्याचे नमुने तपासून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ