नवी मुंबई : महापालिकेने निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी पेमेंट गेट वे प्रणाली सुरू केली आहे. परंतु नवीन प्रणालीप्रमाणे निविदा सादर करण्यासाठी उशीर होत असून ठेकेदारांची दमछाक होत आहे. शेवटच्या दिवशी निविदा दाखल करण्याची सवय लागलेल्यांना याचा मोठा फटका बसू लागला आहे.राज्य शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांना ई- टेंडरिंग प्रणालीमध्ये आॅनलाइन पेमेंट गेट वेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. नवी मंबई महापालिकेनेही या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी २५ नोव्हेंबरपासून २१ दिवस ई - टेंडर प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. दरम्यानच्या काळात ई - टेंडरिंग पद्धतीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. यापूर्वीही ई- टेंडरिंग प्रणाली असली तरी निविदा खरेदी करणे व इसारा रक्कम भरण्यावरून निविदा कोण सादर करणार आहे याची माहिती सर्वांना मिळत होती. यामुळे रिंग होण्याची शक्यता जास्त होती. याचमुळे शासनाने पेमेंट गेट वेची संकल्पना सर्वत्र राबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता कोणत्याही कामाची रिंग करता येणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे.महापालिकेमध्ये पेमेंट गेट वेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु अनेक ठेकेदारांना या पद्धतीने निविदा सादर करण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. आतापर्यंत बहुतांश ठेकेदार शेवटच्या दिवशी निविदा सादर करतात. आता शेवटच्या दिवशी निविदा सादर करण्यासाठी गेल्यानंतर इसारा रक्कम भरताना अडचण निर्माण होवू लागली असून अनेकांना त्याचा फटका बसू लागला आहे.निविदा सादर करताना दमछाक होवू लागली आहे. पहिलीच पद्धत चांगली होती असे मत अनेक जण व्यक्त करत असून काहीजण पालिकेच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करू लागले आहेत. टेंडर भरण्यावरून वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास ४ महिने पालिकेतील कामकाज ठप्प होते. अनेक विकास कामे प्रलंबित आहेत. निवडणुकाजवळ आल्यामुळे सर्वच नगरसेवक विकास कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यातच ई-टेंडरिंगमधील वेळखाऊ पद्धतीमुळे नाराजी वाढली असून यावर प्रशासनाने तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)च्सहशहर अभियंता जी. व्ही. राव यांनी सांगितले की निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा यावा यासाठी शासनाच्या आदेशावरून पेमेंट गेट वे प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली सर्वांच्याच हिताची आहे. च्निविदा सादर करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ असतो. अनेक ठेकेदार शेवटच्या दिवशी निविदा सादर करतात. नवीन प्रणाली न समजल्यामुळे अनेकांना निविदा भरण्यास वेळ लागत आहे. ई-टेंडरिंगमध्ये निविदा भरण्यासाठी वेळ लागत असून अनेकांना टेंडर भरण्यापासूनही वंचित राहावे लागत आहे. विकास कामांमध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला जात असल्याची शंका आहे. हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला पाहिजे. - सुधीर पवार,सरचिटणीस, नवी मुंबई काँग्रेस