Join us  

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही आता अंतर्गत मूल्यमापन गुण लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:57 AM

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून १० आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापन लागू होणार

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून १० आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत मूल्यमापन लागू होणार असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे सुधारित मूल्यमापन योजनेप्रमाणे लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच पुनर्रचित अभ्यासक्रमाप्रमाणे तोंडी/ प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा द्यावी लागणार आहे.यंदापासून ९वी ते १२वीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाबाबत व शासन निर्णयाप्रमाणे निश्चित केलेल्या मूल्यमापन योजनेच्या अनुषंगाने मूल्यमान आराखडा, घटक निहाय गुण विभागणी व लेखी/ तोंडी / प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन योजना या संदर्भात परिपत्रके विभागीय मंडळांना पाठवून कळविण्यात आले आहे. हेच सारे आता नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लागू होणार असून, हे सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना विभागीय मंडळांना परिपत्रकाद्वारे शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.दहावीचे अंतर्गत गुण बंद केल्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले, शिवाय हुशार विद्यार्थ्यांचे गुणही कमी झाले. यावरून सरकारवर टीका झाली. त्यानंतर, सरकारने २५ जणांची समिती नेमून, अंतर्गत मूल्यमापन पुन्हा सुरू केले जाऊ शकते का? याबाबत अभ्यास करण्यास सांगितले. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले आहे..असे असेल सुधारित मूल्यमापनसुधारित मूल्यमापन योजनेनुसार, शैक्षणिक वर्ष २०१९-२०पासून नववी व दहावीकरिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी लेखी परीक्षेद्वारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे असेल.