Join us  

परमबीर सिंग यांना अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:05 AM

२० मेपर्यंत अटक करणार नाही; राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे पोलीस ठाण्यात दाखल ...

२० मेपर्यंत अटक करणार नाही; राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ठाणे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासाठी २० मेपर्यंत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिले.

अकोल्यात बदली केलेले पोलीस भीमराव घाडगे यांनी सिंग यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवरून सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताे रद्द करावा, यासाठी सिंग यांनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्यावर कुहेतूने गुन्हा दाखल केल्याचा दावा त्यांनी केला. सिंग यांना अंतरिम दिलासा मिळावा, अशी मागणी त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला केली.

तर, अकोल्याच्या एक पोलिसाने सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यासंदर्भात तपास सुरू झाला आहे, अशी माहिती राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी. खंबाटा यांनी न्या. पी.बी. वराळे व न्या. अभय अहुजा यांच्या खंडपीठाला दिली. सिंग यांना पोलीस २० मेपर्यंत अटक करणार नाहीत, तोपर्यंत राज्य सरकार त्यांच्या याचिकांवर उत्तर देईन, असे खंबाटा यांनी सांगितले. सिंग यांच्यावर ३० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २० मे रोजी ठेवली.

दरम्यान, न्यायालयाने तक्रारदारालाही सुनावले. ही घटना २०१५ मध्ये घडली आणि २०२१ मध्ये तुम्ही तक्रार कशी करता? असा सवाल केला.

सिंग यांची ठाण्यात बदली करण्यात आली तेव्हा त्यांनी व अन्य काही पोलिसांनी मिळून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत घाडगे यांनी अकोला येथे सिंग यांच्याविरोधात तक्रार केली. अकोला पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवून पुढील तपास ठाणे पोलिसांकडे वर्ग केला. ठाणे पोलीस आयुक्तालयात कामाला असताना घाडगे यांना सिंग यांनी एका प्रकरणातील काही आरोपींची नावे वगळण्याचे आदेश दिले. मात्र त्यांनी तसे न केल्याने सिंग यांनी त्यांच्यावर खोटे आरोप ठेवले, असे तक्रारीत नमूद आहे. घाडगे यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी सिंग यांच्यावर आयपीसीअंतर्गत कट रचणे, पुरावे नष्ट करणे व अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील काही कलम लावले.

............................