Join us  

स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना एक खिडकी, मुख्यमंत्र्यांचे म्हाडाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:49 AM

मुंबईतील जीर्ण झालेल्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमधील गृहनिर्माण संस्थांनीच विकासक होऊन स्वयं पुनर्विकास करावा, म्हणून म्हाडाने स्वयं पुनर्विकास प्रकल्पांसाठी एक खिडकी योजना सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना दिले आहेत.

मुंबई : मुंबईतील जीर्ण झालेल्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमधील गृहनिर्माण संस्थांनीच विकासक होऊन स्वयं पुनर्विकास करावा, म्हणून म्हाडाने स्वयं पुनर्विकास प्रकल्पांसाठी एक खिडकी योजना सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना दिले आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सोमवारी आयोजित मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वयं पुनर्विकास अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.मुख्यमंत्री म्हणाले की, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी व रहिवाशी हे काही विकासक नसतात. त्यांना परवानग्या, प्रक्रिया, नियमावली यांची पुरेशी माहिती नसते. याच अज्ञानाचा फायदा घेत, बहुतेक वेळा विकासक त्यांची फसवणूक करतात. त्यात बहुतेक इमारतींमधील रहिवाशी विकासकाच्या सांगण्यावरून संक्रमण शिबिरांत स्थलांतरित झाले. मात्र, आजही वर्षानुवर्षे ते घरांच्या प्रतीक्षेत खितपत पडले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा विकासकांवरील विश्वास कमी झाला असून, धोकादायक इमारतीत जीव गेला, तरी ते राहते घर सोडत नाहीत. अशा परिस्थितीत मुंबई बँकेने स्वयं पुनर्विकासासाठी सुरू केलेली योजना नक्कीच कौतुकास्पद आहे. भाजपा सरकार या योजनेच्या भक्कमपणे पाठिशी आहे. या योजनेमुळे पुनर्विकासाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. त्यामुळे म्हाडाने पालिकेसह सर्व संबंधित प्राधिकारणांची बैठक घेऊन, एक फ्लोचार्ट तातडीने तयार करण्याचेही आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेच्या स्वयं पुनर्विकास योजनेत येणाºया अडचणींची माहिती दिली, तसेच ही योजना सध्या मुंबईपुरतीच मर्यादित असून, वसई, विरार, ठाणे व नवी मुंबई या मुंबई महानगर कार्यक्षेत्रातही राबविण्यास शासनाची परवानगी देण्याची मागणी केली. तसे झाल्यास या योजनेसाठी लागणारा हजारो कोटींचा निधी सहकारी बँका, संस्थांच्या माध्यमातून उभा करू, असेही दरेकर यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमानंतर स्वयं पुनर्विकासाची सविस्तर माहिती म्हाडाचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू आणि निखिल दीक्षित यांनी दिली. कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार आणि मुंबई बँकेचे संचालक प्रसाद लाड यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या वेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे आणि इतर संचालक उपस्थित होते.कार्यशाळा घेण्याचे आवाहनअधिकाधिक गृहनिर्माण संस्थांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ही योजना अधिक विश्वासार्ह व्हावी, म्हणून म्हाडा आणि मुंबई बँक यांनी संयुक्तरीत्या रहिवाशांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा सुरू कराव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.या कार्यशाळांत स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव कसा बनवावा? त्याची प्रक्रिया व नियमावली काय असते? याची सविस्तर माहिती रहिवाशांना द्यावी. सोबतच सक्षम आर्किटेक्ट, कंत्राटदार, तज्ज्ञ यांचे एक पॅनेल बँकेने आणि म्हाडाने तयार करावे. या पॅनलवरील सक्षम कंत्राटदारांचा पर्याय लोकांना मिळेल आणि विश्वसार्हताही वाढेल, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस