Join us  

‘आयएनएस तरासा’ नौदलाच्या ताफ्यात; पाणबुड्यांना होणारा विलंब चिंताजनक - व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 3:05 AM

कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांच्या निर्मितीला होणा-या विलंबाबाबत नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. युद्धनौका आणि पाणबुड्यांना विलंब झाल्यास निर्मितीचा खर्च वाढतो.

मुंबई : कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांच्या निर्मितीला होणा-या विलंबाबाबत नौदलाच्या पश्चिम तळाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. युद्धनौका आणि पाणबुड्यांना विलंब झाल्यास निर्मितीचा खर्च वाढतो. आपल्याकडील पाणबुड्यांची संख्या पाहता कलवरी श्रेणीतील पाणबुड्यांना होणारा विलंब चिंताजनक असल्याचे लुथ्रा म्हणाले.‘आयएनएस तरासा’ ही तब्बल ४०० टन वजनाची आणि वॉटरजेट तंत्रज्ञानावरील वेगवान गस्तीनौका मंगळवारी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. माझगाव येथील नौदलाच्या गोदीत पार पडलेल्या या सोहळ्यास व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. औपचारिक सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना लुथ्रा म्हणाले की, २०१२ पर्यंत कलवरी श्रेणीतील पाणबुड्या नौदलाकडे सुपुर्द करणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांमुळे त्याला विलंब झाला. भारतात सर्व प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांची बांधणी होत आहे. कलवरी ही पाणबुडी गेल्या वर्षी नौदलात दाखल होणार होती. प्रत्यक्षात काही दिवसांपूर्वीच कलवरी पाणबुडी नौदलाकडे सुपुर्द करण्यात आली. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत ती नौदलाच्या ताफ्यात सामील होईल, असे लुथ्रा म्हणाले. नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झालेली विमानवाहू युद्धनौका विराटबाबत येत्या तीन-चार महिन्यांत निर्णय घ्यावा लागेल. विराटवर कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्यासाठी आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यांनी स्वारस्य दाखविल्याचेही लुथ्रा यांनी सांगितले.‘आयएनएस तरासा’कोलकात्यातील ‘गार्डनरीच शिपयार्ड अ‍ॅण्ड इंजिनीअर्स’च्या गोदीत या गस्तीनौकेची बांधणी करण्यात आली आहे. वॉटरजेट तंत्रज्ञानावरील ही चौथी आणि शेवटची ‘आयएनएस तरासा’ गस्तीनौका मंगळवारी औपचारिकपणे नौदलाच्या पश्चिम तळाच्या ताफ्यात दाखल झाली. अंदमान-निकोबार समूहातील बेटांच्या नावांवरून या श्रेणीतील नौकांना नावे देण्यात आली आहेत. २०१६ साली या श्रेणीतील तरमुगली आणि तिहायू या दोन नौका नौदलात दाखल करण्यात आल्या असून विशाखापट्टणम त्यांचे केंद्र आहे.शस्त्रास्त्रे : अडीच किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारी देशी बनावटीची ३० एमएमची मुख्य तोफ, सोबत मध्यम व लहान आकाराच्या अनेक तोफावजन : ४०० टनलांबी : ५० मीटरवेग : ताशी ३५ मैल(६५ कि.मी.)उपयोग : किनाºयांची निगराणी, गस्त, समुद्र कारवायांसोबतच बचावकार्यात उपयुक्त. उथळ पाण्यातही संचाराची क्षमता

टॅग्स :मुंबई