Join us  

निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या फलकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 1:24 AM

पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम उच्च न्यायालयाने तूर्तास थांबविले.

मुंबई : पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम उच्च न्यायालयाने तूर्तास थांबविले. मात्र राजकीय पक्षाने मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत उदासीनता दाखविल्यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असे फलक वरळी परिसरात कोळी बांधवांनी लावले. परंतु, हे फलक तत्काळ काढून टाकत काही मच्छीमार बांधवांना पोलिसांनी जाब विचारल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे या फलकांमुळे नियम भंग होत आहे का, याची चौकशी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकामार्फत करण्यात येत आहे.प्रियदर्शनी पार्क ते कांदिवली असा पहिला कोस्टल रोड तयार करण्यात येत आहे. परंतु या प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकण्यात येत असल्याने वरळी येथील मच्छीमारांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे उपजीविका नष्ट होत असताना लोकप्रतिनिधी हा प्रश्न सोडविण्याचे कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे फलक वरळी कोळीवाडा येथे स्थानिक मच्छीमारांनी लावले होते.पोलिसांनी संध्याकाळी येऊन हे फलक खाली उतरविले. तसेच काही मच्छीमारांची नावे लिहून घेतली. या फलकामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. पण हा फलक राजकीय पक्षाचा नाही. या देशाचे नागरिक असल्याने आमचे मत मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. नोटाचा पर्याय निवडून आम्ही आमचा विरोध निवडणुकीमध्ये दर्शवू शकतो. मग याला आचारसंहितेचे उल्लंघन कसे म्हणता येईल, असा सवाल वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी केला.कोस्टल रोड प्रकल्पामुळे वरळी येथील पश्चिमेकडील किनाऱ्याला दोनशे मीटर ते पाचशे मीटरचा भराव टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी रस्ताच नव्हे तर वाहनतळ, उद्यानही तयार करण्यात येणार आहे. मात्र या भरावामुळे मच्छीमारांची उपजीविका धोक्यात आली आहे. तसेच मोठ्या भरतीच्या वेळी वरळी गावात पावसाचे पाणी भरेल. आमच्या मागण्या पूर्ण होत नसतील तर मतदानासाठी जाण्याची गरज नाही, असे फलकावर लिहिले आहे.>तक्रारीनंतर निर्णयपालिकेनेच काही दिवसांपूर्वी हे फलक काढले. अशा पद्धतीने फलक लावणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे का? याची चौकशी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकामार्फत करण्यात येत आहे. त्यांची तक्रार आल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी सांगितले.