Join us  

इंद्राणी म्हणे, शांत बसा...

By admin | Published: June 25, 2017 2:10 AM

टेबल, खुर्चीं, स्वयंपाक घरातील सामानाची तोडफोड, तर कुठे छतावर चढून सुरू असलेल्या जाळपोळीसह

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टेबल, खुर्चीं, स्वयंपाक घरातील सामानाची तोडफोड, तर कुठे छतावर चढून सुरू असलेल्या जाळपोळीसह प्रशासनाविरोधातील नारेबाजीने शनिवारी भायखळा कारागृह हादरून गेले. अशात महिला कैद्यांना शांत करण्यासाठी शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीने चक्क पोलिसांच्या हातून माइक घेत शांत बसण्याचा सल्ला दिला. मात्र महिलांनी तिलाच शांत बसवत गदारोळ सुरूच ठेवला. भायखळा कारागृहात जवळपास दोनशे ते अडीचशे महिला कैदी आहेत. याच कैद्यांमध्ये इंद्राणी मुखर्जीही कैद आहे. शुक्रवारी रात्री मंजुळा शेट्ट्ये (३२) या महिला कैद्याचा कारागृहात मृत्यू झाला. जेलरच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत या महिला कैद्यांनी रौद्ररूप धारण केले होते. या वेळी हातात मिळेल त्या वस्तूची तोडफोड सुरू होती. स्वयंपाक घरातील भांडी, तेथील दगड त्यांनी पोलिसांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केल्यामुळे परिस्थिती तणावग्रस्त झाली होती. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात केल्याने कारागृहाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा प्रकारच्या गोंधळाची ही पहिलीच घटना आहे. यातील काही महिला कारागृहाच्या छतावर पोहोचल्या. त्यांनी कारागृहातील कपड्यांची जाळपोळ करत प्रशासनाविरुद्ध नारेबाजी केली. तर अन्य महिला कैद्यांनी आतमध्ये धरणे आंदोलन सुरू केले. पोलीस माइकवरून त्यांची समजूत काढत होते. तेव्हा इंद्राणीने त्यांना समजाविण्यासाठी पुढाकार घेतला. टेबलावर उभे राहत हातात माइक घेत इंद्राणी ‘शांत बसा, कायदा हातात घेऊ नका’, असे समजावत होती. मात्र महिलांनी तिलाच तिच्या गुन्ह्यांची जाणीव करून देत तिला शिवीगाळ करून खाली उतरवले. शांतीसाठी पुढे सरसावलेल्या इंद्राणीनेही भीतीने काढता पाय घेतल्याची माहिती कारागृह सूत्रांकडून मिळाली.

महिला कैद्यांच्या आरोपावरून चौकशी सुरूमहिला कैद्यांनी केलेल्या आरोपावरून शेट्ट्ये मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये महिलांनी कारागृह प्रशासनाकडून होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. कोण होती मंजुळा?भांडुपमधील रहिवासी असलेली मंजुळा ही भांडुपच्या एका शाळेत शिक्षिका होती. १९९६ मध्ये तिने आई गोदावरीच्या मदतीने तिच्या भावजयीची जाळून हत्या केली. या गुन्ह्यात दोघींनाही दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दोघींचीही रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या आईचा आजारपणामुळे कारागृहातच मृत्यू झाला. त्यामुळे तिने तेथे करमत नसून भायखळा कारागृहात बदली करून देण्याची मागणी केली. गेल्या पाच महिन्यांपासून ती भायखळा कारागृहात आहे. शुक्रवारी रात्री तिचाही आजारपणामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. अफवा, तणाव आणि पोलिसांची डोकेदुखी...मंजुळाच्या मृत्यूने निर्माण झालेल्या तणावामुळे कैद्यांच्या नातेवाइकांना कारागृहात प्रवेश बंद करण्यात आला होता. तेव्हा नेमके प्रकरण माहिती नसल्यामुळे नातेवाइकांनी नानाविध तर्क लावण्यास सुरुवात केली. जेलरच्या मारहाणीत मृत्यू झाल्यापासून, ‘जेलरने महिला कैदी को जला के मार डाला, दो कैदी मारे गये है!’ अशा नानाविध अफवारूपी चर्चा नातेवाइकांमध्ये रंगल्या होत्या. त्यामुळे नातेवाइकांनी कारागृहाबाहेर गोंधळ घातला. आतमध्ये कैद्यांचा हैदोस तर बाहेर नातेवाइकांचा हट्ट यामुळे पोलिसांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास नातेवाइकांना आत सोडण्यास परवानगी दिली.