"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 20:51 IST2025-12-07T20:24:26+5:302025-12-07T20:51:16+5:30
नागपूर अधिवेशनापूर्वीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
CM Devendra Fadnavis On Uddhav Thackery: विधीमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरकडे कूच केलेल्या अनेक आमदारांना एअरलाइन कंपनी इंडिगोच्या अनपेक्षित फटक्याचा सामना करावा लागला आहे. कंपनीच्या अनेक विमानसेवा रद्द झाल्यामुळे अनेक आमदारांची नागपूरची तिकिटे रद्द झाली. त्यामुळे या आमदारांना आता गाडीने किंवा रेल्वेने नागपूरला पोहोचावं लागत आहे. आदित्य ठाकरे यांनाही विमान प्रवासाचा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.
उद्धव ठाकरे हे दोन दिवस अधिवेशनासाठी नागपूरला येणार आहेत. त्यांच्या विमानाला काही अडचण येणार नाही ना? असा प्रश्न एका पत्रकाराने एकनाथ शिंदे यांना विचारला. यावरुन उद्धव ठाकरे अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहत नाहीत,अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली. "आरोप-टीका करायची असेल तर अधिवेशनात तरी पूर्ण वेळ बसलं पाहिजे. (आता विमान रद्द होण्याचे) उलट ते (विरोधक) कारण सांगत आहेत," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचा खोचक टोला
उपमुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. "उद्धव ठाकरे हे इंडिगोच्या विमानाने फिरत नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे. ते ज्या विमानाने फिरतात, त्याला कुठलीही अडचण नाही. त्यामुळे ते नीट येऊ शकतात. बाकी कोणाला अडचण असेल तर मी आणि एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्ग बांधलेला आहे. गाडी पाहिजे असेल तर पाठवून देतो. सात ते आठ तासात गाडीने नागपुरात पोहोचता येते," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आमदारांची समृद्धी महामार्गावर धाव
महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी आज दुपारच्या विमानाचे तिकीट काढले होते, पण इंडिगोने ऐनवेळी सेवा रद्द केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे आता अनेक आमदारांनी विमानाचा नाद सोडून समृद्धी महामार्गावरून तातडीने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे.