इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 05:33 IST2025-12-09T05:32:59+5:302025-12-09T05:33:43+5:30
नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी फसल्यानंतर आता वैमानिकांची संख्या अपुरी असल्याची जाणीव कंपनीला झाली असून कंपनीने येत्या १० फेब्रुवारीपर्यंत १५८ नव्या वैमानिकांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
मुंबई : इंडिगोच्या सेवेत गोंधळ झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे पाच हजार उड्डाणे रद्द झाली आहेत. गोंधळाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी येत्या बुधवारी डीजीसीएची उच्चस्तरीय समिती कंपनीचे प्रमुख पीटर एल्बिस यांना चौकशीसाठी बोलावणार असल्याचे कळते. इंडिगो कंपनीच्या विमानांचा घोळ सोमवारीही कायम होता. सोमवारी कंपनीची देशभरातून ५६२ पेक्षा अधिक विमाने रद्द झाली.
९०० नव्या वैमानिकांची इंडिगोत भरती
नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी फसल्यानंतर आता वैमानिकांची संख्या अपुरी असल्याची जाणीव कंपनीला झाली असून कंपनीने येत्या १० फेब्रुवारीपर्यंत १५८ नव्या वैमानिकांची भरती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, डिसेंबर २०२६ पर्यंत आणखी ७४२ वैमानिकांची भरती होणार असल्याचे समजते.
प्रवाशांना ८२७ कोटींचा रिफंड : नागरी विमान वाहतूक
महासंचालयाने (डीजीसीए) दणका दिल्यानंतर कंपनीने आतापर्यंत ९ लाख ५५ हजार ५९१ प्रवाशांना ८२७ कोटी रुपये रिफंड दिला आहे. सहा प्रमुख शहरांपैकी बंगळुरू येथून सर्वाधिक १५० विमाने तर मुंबईतून ११५ विमाने रद्द झाली.