Join us  

चीन व इटलीमध्ये निर्यात बंद झाल्याने भारताला 245 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:44 PM

चीन व इटलीमध्ये निर्यात बंद झाल्याने भारताला 245 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसण्याची भीती वर्ल्ड ट्रेड सेंटरचा अंदाज

चीन व इटलीमध्ये निर्यात बंद झाल्याने भारताला 245 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसण्याची भीती 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे देशातून इटली व चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीवर प्रतिबंध लागू झाले आहेत. त्यामुळे चीन व इटलीमध्ये निर्यात बंद झाल्याने मार्च महिन्यात भारताला 245 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

चीन व इटलीमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला फटका बसू लागला आहे. केवळ मार्च महिन्यात हा फटका 245 दशलक्ष डॉलर्सचा असेल. गतवर्षीच्या मार्च महिन्याचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

चीन व इटली या दोन देशांमध्ये भारताच्या एकूण कृषी निर्यातीच्या 9 टक्के निर्यात केली जाते. एकट्या चीनचा त्यामध्ये 7.7 % हिस्सा आहे. चीन व इटलीमध्ये भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये गतवर्षी 2018-19 मध्ये 2017-18 च्या तुलनेत 89 % वाढ झाली होती. या वाढीला आता ब्रेक लागला आहे. भारतातून इटलीमध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये कॉफीचा वाटा 50% आहे. या व्यतिरिक्त बासमती तांदूळ, तेल यांच्या निर्यातीवर देखील प्रतिकूल परिमाण होण्याची भीती आहे. साखर निर्यातीला याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. 

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरील बंदी व जलमार्गे होणाऱ्या मालवाहतुकीमध्ये येत असलेले अडथळे यामुळे  जगातील इतर देशांमध्ये भारतातून केल्या जाणाऱ्या निर्यातीवर देखील परिणाम होऊ लागला आहे. जहाजांच्या अपुऱ्या संख्येमुळे जलमार्गाने होणाऱ्या मालवाहतुकीचे दर वाढू लागले आहेत. 

याबाबत वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या वरिष्ठ संचालक रुपा नाईक म्हणाल्या,  चीनमध्ये भारतातून केल्या जाणाऱ्या कृषी उत्पादनाचा हिस्सा 7.7 % असला तरी त्यामध्ये सातत्याने होणारी वाढ या परिस्थितीमुळे रोखली गेली आहे. एकीकडे जगभरात होणारी भारताची कृषी निर्यात 6.1 % घटली असताना चीनमधील निर्यात वाढली होती मात्र सद्यपरिस्थितीमुळे ही गंभीर अवस्था झाल्याने संकट अधिक गहिरे झाले आहे.