Join us  

लहानग्यांमध्येही वाढता धोका; लसीकरण प्रक्रियेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 7:21 AM

लहान मुलांमध्ये आजाराचा मुकाबला करण्याची क्षमता चांगली आहे. ज्येष्ठांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये, आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी आहे. कोरोना होण्याची संख्या वाढत असली. तरी, ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना होणारा आजार अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे, असे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. नूतन चिलवान यांनी मांडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहानग्यांच्या संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अन्य संवेदनशील गटांप्रमाणे या गटातील बाधितांची संख्याही अधिक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे बालरोगतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकऱणाची प्रक्रिया लवकरच सुरळीत होणार आहे, मात्र लहान मुले- मुली लसीकऱणाच्या प्रक्रियेपासून दूर असल्याने त्यांच्या आरोग्यास धोका कायम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत नवजात बालक ते नऊ वर्षांपर्यंतच्या ९ हजार ५१४ लहानग्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १० ते १९ वयोगटातील २४ हजार ७२७ प्रौढ मुला- मुलींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या तुलनेत लहानग्यांना होणारा संसर्ग कमी असला तरी अजूनही लसीकरण प्रक्रियेविषयी काही स्पष्टता नाही, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

लहान मुलांमध्ये आजाराचा मुकाबला करण्याची क्षमता चांगली आहे. ज्येष्ठांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये, आजारामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी आहे. कोरोना होण्याची संख्या वाढत असली. तरी, ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना होणारा आजार अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे, असे निरीक्षण बालरोगतज्ज्ञ डॉ. नूतन चिलवान यांनी मांडले आहे.जागतिक पातळीवर केवळ अमेरिकत लहानग्यांच्या लसीची चाचणी सुरु झाली आहे. मात्र अजूनही ती अंतिम टप्प्यात नाही, ती प्रक्रिया अत्यंत लांबलचक आणि अभ्यासपूर्ण असते. परंतु, देशात अजूनही कोणत्याही ठिकाणी लहानग्यांच्या लसीची चाचणी झालेली नाही. त्यामुळे सध्या केवळ प्रौढांसाठीच लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे लसीकऱण सुरु झाले आहे. परंतु, सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, मोठ्यांच्या तुलनेत आजारांशी लढण्यासाठी लहानग्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असते, अत्यंत अपवादात्मक स्थितीत या आजारांत गुंतागुंत निर्माण होते. परिणामी, सद्य स्थितीत लहानग्यांचे लसीकऱण सुरु होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी जावा लागेल, त्यामुळे मास्कचा वापर, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, शारीरिक अंतर आणि स्वच्छतेविषयी नियम पाळल्याने हा आजार दूर ठेवण्यास मदत होईल, असे मत बालरोगतज्ज्ञ डॉ. आदिल जैन यांनी मांडले. त्याचप्रमाणे, लहानग्यांच्या आहार-पोषणाकडे काटेकोरपणे लक्ष दिल्यास अन्य संसर्गापासूनही त्यांना दूर ठेवणे सोपे जाईल असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस