Join us  

लॉकडाऊन काळात पायाभूत सुविधांसाठीच्या बांधकामा दरम्यान वाढले ध्वनी प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:08 AM

पायाभूत सुविधांसाठीच्या कामांचा परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पायाभूत सेवा-सुविधा यांच्या बांधकामा ...

पायाभूत सुविधांसाठीच्या कामांचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पायाभूत सेवा-सुविधा यांच्या बांधकामा दरम्यान होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाने देखील नागरिकांना कमालीचा त्रास दिला आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या काळात देखील बांधकाम सुरू असताना होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असताना याकडे साफ कानाडोळा केला जात आहे. परिणामी वाढत्या ध्वनी प्रदूषणाबद्दल तक्रारींचा भडीमार होत असून राज्य सरकार असो अथवा प्रदूषण मंडळ असो; या दोन्ही प्राधिकरणाने याबाबत कारवाई करणे अपेक्षित आहे, असे म्हणणे प्रदूषणाबाबत सातत्याने आवाज उठवित असलेल्या पर्यावरण तज्ज्ञांकडून मांडले जात आहे.

ध्वनी प्रदूषणाबाबत सातत्याने आवाज उठवित असलेल्या आवाज फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान बहुतांश कामे ठप्प होती. मात्र जसजसे लॉकडाऊन शिथिल होत गेले तसा बांधकामांचा वेग वाढला. मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे, रस्त्यांची, पुलांची कामे सुरू झाली. कोस्टल रोड तसेच इतर रस्ते आणि बांधकामांशी निगडित कामेही वेगाने सुरू झाली. कोस्टल रोडचे काम करताना दिवस आणि रात्र असे बंधनही पाळण्यात आले नाही. दोन्ही वेळेत रोडचे काम सुरू होते. त्यामुळे त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. याच काळात रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी असली तरी इतर घटक ध्वनी प्रदूषणात भर घालत होते. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे फलाटांवर होणाऱ्या घोषणा, प्रार्थनास्थळांमधून होणारा आवाज याचा समावेश होता. मुळात लॉकडाऊन काळात ध्वनी प्रदूषणाची मात्रा कमी असणे गरजेचे होते. मात्र प्रत्येक घटकाचा विचार करता आणि त्या प्रत्येक घटकाकडून केले जाणारे ध्वनी प्रदूषण लक्षात घेता सातत्याने वाढत असलेल्या आवाजाने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे.

दरम्यान या काळात तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. कारण लॉकडाऊनवेळी पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण होता. सरकारी कामाची तक्रार केलीच तरी कारवाई होत नसल्याचे माहीत असल्याने लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. याचा अर्थ मुंबई शांत आहे म्हणजे ध्वनी प्रदूषण होत नाही असे नव्हे तर इतर आवाजही ध्वनी प्रदूषणात सातत्याने भर घालत आहेत. ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असतानाच वैयक्तिक स्तरावरही प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा ध्वनी प्रदूषणामुळे हाेणारे आजार गंभीर स्वरूप धारण करतील आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास दिवसागणिक वाढतच जाईल. ध्वनी प्रदूषणावर उपाय म्हणजे प्रदूषण जेथून होते ते स्त्रोत शोधणे गरजेचे आहे. सरकारी पातळीवर प्रयत्न होत असतानाच वैयक्तिक स्तरावर देखील काम होणे गरजेचे आहे, असे सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले.

..................................