Join us  

मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:05 AM

विमान उड्डाणांची संख्याही ३५०वर; दुसरी लाट ओसरल्याचा सकारात्मक परिणामलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थ चिंतेत ...

विमान उड्डाणांची संख्याही ३५०वर; दुसरी लाट ओसरल्याचा सकारात्मक परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थ चिंतेत सापडलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने आशेचा किरण दाखवला. कोरोनाबाधितांचा आलेख घसरणीला लागताच मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणे आणि प्रवासी संख्येत मे महिन्याच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर दोन महिने बंद असलेली प्रवासी विमानसेवा २५ मे २०२० पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. मात्र, आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरील निर्बंध अद्याप कायम असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. डिसेंबरमध्ये पहिल्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर देशांतर्गत विमान प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली. फेब्रुवारीत तर ती पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हवाई वाहतूक क्षेत्राचे उड्डाण पुन्हा राेखले.

रुग्णसंख्येने नवे उच्चांक गाठण्यास सुरुवात केल्याने एप्रिलमध्ये महाराष्ट्र, दिल्लीसह बहुसंख्य राज्यांत कठोर निर्बंध लागू करण्यात आले. दुसरीकडे भारतीय व्हेरिएंटची धास्ती घेतलेल्या देशांनी येथील प्रवाशांवर बंदी घातल्यामुळे हवाई प्रवासी संख्येचा आलेख पुन्हा गडगडला. मुंबई विमानतळावर तर मे महिन्यात एकूण प्रवासी संख्येत ९० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. कोरोनाआधी येथून दिवसाला सरासरी १ लाख ४० हजार प्रवासी ये-जा करायचे. मे मध्ये ही संख्या १७ हजार ६०० पर्यंत खाली आल्याने विमान कंपन्यांपुढील अर्थ संकट आणखी गडद झाले.

आता दुसरी लाट ओसरताच मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येत पुन्हा वाढ नोंदविण्यात आली आहे. विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत येथील दैनंदिन उड्डाण संख्या सरासरी ३५० वर पोहोचली आहे. मे महिन्यात ही संख्या १५० इतकी नोंदविण्यात आली होती. प्रवासी संख्याही दुपटीने वाढून सरासरी ३४ हजारांवर (प्रतिदिन) पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे.

* मुंबई विमानतळावरील सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या

जानेवारी - ५५,८००

फेब्रुवारी - ६३,५००

मार्च - ५०,९००

एप्रिल - ३४,६००

मे - १७,६००

जून - ३४ हजार

------------------------------------------