Join us  

मुंबईच्या किमान तापमानात वाढ

By admin | Published: January 06, 2015 1:26 AM

बंगालच्या उपसागरावरील निवळलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तरेकडून दक्षिणकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा ओसरलेला काहीसा प्रभाव, यामुळे किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात आली

मुंबई : बंगालच्या उपसागरावरील निवळलेले कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तरेकडून दक्षिणकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा ओसरलेला काहीसा प्रभाव, यामुळे किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात आली असून, राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात येत आहे. शिवाय मुंबईच्या किमान तापमानातही ४ अंशाची वाढ झाली असून, रात्र वगळता दिवसा शहरात पडलेल्या थंडीचा जोर ओसरला आहे.उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान खाली घसरले होते. नागपूर शहराचा पारा तर तब्बल ५ अंशावर घसरला होता. नागपूरसह नाशिक, औरंगाबाद, मालेगावसह उर्वरित शहरांच्या किमान तापमानातदेखील घसरण झाली होती. परिणामी राज्याला हुडहुडी भरली होती. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू झाला. या बदलत्या तापमानामुळे राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार नोंदविण्यात आले होते. थंड वारा आणि अवकाळी पावसाच्या घटनांनंतर राज्यातील शहरांच्या किमान तापमानात वाढ झाली होती. परिणामी नागपूर शहराचे ५ अंशावर घसरलेले किमान तापमान थेट १५ अंशावर जाऊन ठेपले. सोमवारी शहराच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली असून, हे किमान तापमान २० अंशांवर जाऊन ठेपले आहे. तत्पूर्वी रविवारी शहराचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. कमाल तापमानातदेखील काही अंशी वाढ नोंदविण्यात आली असून, कमाल तापमान २८ हून ३० अंशावर पोहोचले आहे. परिणामी शहरातील गारव्याचा जोर काहीसा ओसरला आहे. (प्रतिनिधी)किमान तापमान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले.