Join us  

उष्णता कमी करण्यासाठी हरित आच्छादन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:06 AM

पर्यावरण दशकाची निकडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी वायुप्रदूषक उत्सर्जकांशी संबंधित नियम आखणे, कमी प्रदूषण ...

पर्यावरण दशकाची निकड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी वायुप्रदूषक उत्सर्जकांशी संबंधित नियम आखणे, कमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांसाठी जिल्हावार धोरण निश्चित करणे, औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे, सध्याची वाहने सोडून विजेवर आधारित वाहनांकडे वळणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहनपर मदत करणे, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, वाहनांचा सामूहिक वापर वाढवून रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणे, नगरविकासाचे नियोजन करताना सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना प्रोत्साहनपर योजना राबवणे, धूळ आणि उष्णतेचे नियमन करण्यासाठी शहरांमधील हरित आच्छादन वाढवणे, अशा अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत.

पर्पज, असर आणि क्लायमेट ट्रेंड्स् या तीन संस्थांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या क्लायमेट व्हाइसेस आणि माझी वसुंधरा (महाराष्ट्र पर्यावरण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित आभासी सभेचे यजमानपद ना नफा तत्त्वावरील वातावरण फाऊंडेशन आणि सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) यांनी भूषविले. पर्यावरण दिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केल्या जाणार असलेल्या अशा प्रकारच्या एकूण चार सभांपैकी ही पहिली सभा वायुप्रदूषणावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी या मुद्द्यांवर जोर देण्यात आला.

वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यावेळी म्हणाले, स्वच्छ हवा ही केवळ सरकारची किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची जबाबदारी नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला यात महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे. कारण वायुप्रदूषण हे सामूहिक आव्हान आहे. केवळ सामूहिक व संयुक्त प्रयत्नांनीच त्यावर मात करता येऊ शकते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक (हवेची गुणवत्ता) डॉ. व्ही. एम. म्हणाले की, वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची आकडेवारी पाहता आम्ही विजेवरील वाहनांसाठी आग्रही आहोत. लवकरच आम्ही संपूर्ण राज्यासाठी विस्तृत वीज वाहन धोरण तयार करणार आहोत. तूर्त आम्ही या प्रकल्पासाठी ठाणे शहराची निवड केली आहे.

चंद्रपूर येथील प्राध्यापक योगेश दूधपाचरे म्हणाले, मला दम्याचा त्रास, त्वचेच्या समस्या आणि डोळ्यांची जळजळ हे त्रास आहेत. चंद्रपूरच्या प्रदूषणाची ही देण आहे. दाट जंगल आणि वाघांची सर्वात जास्त संख्या असलेले हे शहर त्याच्या रहिवाशांसाठी गॅस चेंबर बनले आहे.