Join us  

पालिका प्रशासनामुळेच मुंबई तुंबण्याच्या घटना - भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:06 AM

मुंबई : महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच मुंबईची तुंबई झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे ...

मुंबई : महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळेच मुंबईची तुंबई झाल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, मालाड या ठिकाणी भिंत, दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३२ नागरिकांचा बळी गेला. अनेक दुकानदार, चाळकरी आणि तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याला जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जगताप यांनी केली.

आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप यांनी अतिवृष्टीमुळे मुंबईत होणाऱ्या दुर्घटना, दहिसर येथे वकिलावर झालेला तलवार हल्ला, केंद्र सरकारकडून पेगॅससद्वारे होणाऱ्या हेरगिरीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, लीगल सेलचे रवी जाधव उपस्थित होते. जगताप म्हणाले की, मुंबईत नालेसफाई झाली नसल्याचे काँग्रेसने यापूर्वीच दाखवून दिले होते. तसेच मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्याही साफ केल्या नाहीत. त्यामुळे २१७ नवीन ठिकाणी पाणी तुंबले, तसेच अनेक ठिकाणी उपसा पंप निकामी झाल्याचा आरोप भाई जगताप यांनी केला. भांडुपमध्ये तर जलशुद्धीकरण संकुलातील उदंचन संयंत्रामध्ये पाणी शिरल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. वीजपुरवठा खंडित करावा लागला, संपूर्ण मुंबईत पाणीपुरवठा बंद होता. या जलशुद्धीकरण संकुलात पाणी शिरू नये यासाठी महापालिकेने कुठल्याही प्रकारची व्यवस्था आजपर्यंत केलेली नाही. या सर्व दुर्घटनांना संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचा गलथानपणा, निष्काळजीपणा जबाबदार आहे. संबंधित भागातील पालिकेचे अधिकारी, वॉर्ड ऑफिसर्स यांची जबाबदारी निश्चित करून तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणीही भाई जगताप यांनी केली.

भाई जगताप पुढे म्हणाले, दहिसरमध्ये काही दिवसापूर्वी एका वकिलावर तलवारीने हल्ला झाला. न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या वकिलांवर होणारे हल्ले ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. वकिलांवरील असे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक कायदा करावा, अशी आमची मागणी आहे. मुंबई काँग्रेसच्या लीगल सेलच्या टीमकडून या विषयाचा पाठपुरावा केला जाणार आहे.