Join us  

मारहाणीच्या घटनेची दखल नाही, दीड महिना उलटूनही गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 5:02 AM

दीड महिन्यापूर्वी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना एका तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळीने वाटेत अडविले आणि मारहाण सुरू केली. बचावासाठी तरुणाने पळ काढला.

मनीषा म्हात्रे।मुंबई : दीड महिन्यापूर्वी रात्रीच्या सुमारास घरी परतत असताना एका तरुणाला पाच ते सहा जणांच्या टोळीने वाटेत अडविले आणि मारहाण सुरू केली. बचावासाठी तरुणाने पळ काढला.चॉपरसहित मागे लागलेल्या टोळीने त्याच्या हातावर वार केले. भररस्त्यात सुरू असलेल्या या थरारानंतर त्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मेडिकल मेमो देत त्याला रुग्णालयात पाठविले. मात्र या घटनेला दीड महिना उलटला तरी पोलीस याबाबत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा प्रकार भांडुपमध्ये समोर येत आहे.भांडुप सोनापूर परिसरात गुलाम मुस्तफा मोहम्मद चौधरीचा भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. ३ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास तो काम संपवून घरी निघाला. तेव्हा वाटेतच पाच ते सहा जणांच्या टोळीने त्याला अडविले. त्याच्यासोबत भांडण सुरू केले. त्याने जाब विचारण्यापूर्वीच त्याला मारहाण सुरू केली. त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्यांच्याकडील चॉपरने त्याच्या हातावर वार केले. रस्त्यावर रंगलेल्या थरारानंतर त्याने भांडुप पोलीस ठाणे गाठले. भांडुप पोलिसांनी त्याला मेडिकल मेमो देत अग्रवाल रुग्णालयात जाण्यास सांगितले. तेथे त्याला ११ टाके बसले. पुढे त्याला त्याला सायन रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र सायन रुग्णालयात जागा नसल्याने तो घरी आला. ४ जुलै रोजी जास्त त्रास झाल्याने तो अग्रवाल रुग्णालयात दाखल झाला.त्यानंतर त्याचा भाऊ मुर्तुजा यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. तेव्हा भांडुप पोलिसांनी गुलामचा जबाब नोंदविल्याचे दाखवून निघून गेले. मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आरोपींवर कारवाई व्हावी म्हणून चौधरीने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून पोलीस आयुक्तांपर्यंत लेखी तक्रार केली. मात्र दीडमहिना उलटूनही काहीही कारवाई केली जात नसल्याचे चौधरी यांचा भाऊ मुर्तुजा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. पोलिसांकडे घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पोलीस गुन्हा दाखल करण्याऐवजी आरोपींना पाठीशी घालत असून गुलामविरुद्धच खोटी तक्रार दाखल करण्याची भीती दाखवत असल्याचेही मुर्तुजा यांचे म्हणणे आहे.याबाबत भांडुप पोलीस ठाण्याचे श्रीनिवास पन्हाळे यांच्याकडे विचारणा केली असता, असे कुठलेही प्रकरण आपल्यासमोर आलेले नाही. याबाबत अधिक माहिती घेतली जाईल. तक्रारदाराने माझ्याकडे यावे. त्यांची तक्रार नोंदवून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.