Join us  

राज्यात महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे, विदर्भात हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे, विदर्भात हे प्रमाण सर्वाधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट आफ पाॅलिटिक्स अँड इकाेनाॅमिक्सच्या कौस्तव घोष आणि आगरतळा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या मिथुन माॅग या दोघांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील १५ ते ४९ वयोगटातील महिलांच्या आरोग्याचा अभ्यास केला. क्लिनिकल एपिडेमिओलॅजी अँड ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या दोघांच्या संशोधन अहवालात केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालातील सांख्यिक माहितीचा वापर करण्यात आला आहे.

रक्तक्षयाचे मुख्य कारण म्हणजे आहारात लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी - १२ आणि प्रथिनाचा अभाव असणे होय. या अहवालानुसार, राज्यातील ५४.२ टक्के महिलांना रक्तक्षयाचा आजार आहे. २०१४-१५च्या तुलनेत २०१९-२० दरम्यान या रक्ताक्षयाच्या प्रमाणात ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

२०१४-१५च्या अहवालानुसार, नंदुरबार येथील ६०.२२ टक्के महिलांना रक्तक्षय झाल्याचे समोर आले आहे, तर २०१९-२० साली गडचिरोली येथील ६६.२० टक्के महिलांना रक्तक्षय झाल्याची नोंद आहे. राज्यात वाशिम जिल्ह्यात स्त्रियांना रक्तक्षय होण्याचे प्रमाण सर्वांत कमी असून, हे प्रमाण ३५.४६ टक्के इतके आहे. पाच वर्षांपूर्वीही या जिल्ह्यात सर्वात कमी रक्तक्षय असल्याची नोंद होती, त्यावेळी हे प्रमाण ४१.२० इतके होते. राज्यात मागील पाच वर्षांत पाच जिल्ह्यांमध्ये रक्तक्षय होण्याचे प्रमाण कमी होत गेल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. त्यात मुंबई, मुंबई उपनगर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे, तर दुसरीकडे रक्तक्षयाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, जळगाव, वर्धा, धुळे, यवतमाळ, परभणी यांचा समावेश आहे.

* कसा करावा सामना?

महिलांना रक्तक्षयाचा विविध आघाड्यांवर सामना करावा लागतो. महिलांचे शिक्षण सुधारणे, वरचेवर वैद्यकीय तपासणी करणे, पौष्टिक अन्न, समुपदेशन करणे, लोह, बी कॉम्प्लेक्स गोळ्या वितरित करणे आदी ॲनिमिया टाळण्यासाठी आवश्यक आहे. मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव, आययुडीमुळे होणारा रक्तस्त्राव अशा समस्यांबाबत महिलांनी स्त्रीरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करुन वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.

* वेळीच निदान होणे महत्त्वाचे

नियमित आरोग्य तपासणी, गरोदरपणात शक्य तितक्या लवकर रुग्णालयात नोंदणी केल्यास योग्य लोह आणि फोलेटपूरक मूल्यमापनाला मदत होते. गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन पर्यायांबद्दल महिलांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. अशक्तपणा, फिकट गुलाबी त्वचा, श्वास लागणे आदी त्रास होत असेल तर ही रक्तक्षयाची सामान्य लक्षणे आहेत. नियमित सोनोग्राफी आणि कर्करोग तपासणी, वेळीच निदान हे उपचारांमध्ये मदत करू शकते.

- डॉ. शैलेजा सोलंकी, आहारतज्ज्ञ

* ही आहेत प्रमुख कारणे

मासिक पाळीवेळी सर्व महिला ठराविक प्रमाणात रक्त गमावतात. काही स्त्रियांना याचा जास्त त्रास होतो. हार्मोनल असंतुलन, गर्भाशयाच्या फायब्रोईड्स, जननेंद्रियाचे विविध कर्करोग, अल्सर इत्यादी याला जबाबदार असू शकतात. चांगला आहार न घेणे हेदेखील यामागचे एक प्रमुख कारण आहे. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या आहाराकडे पुरेसे लक्ष देत नाहीत, ज्यात लोहाची कमतरता असते. रक्तक्षयाचा त्रास अशा महिलांना अधिक हाेताे. जास्त प्रमाणात गर्भधारणा, जास्तवेळ स्तनपान, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर यामुळेही समस्या उद्भवू शकते.

.........................