Join us  

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर मंडपेश्वर लेणी शिवमंदिराच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे उदघाटन

By मनोहर कुंभेजकर | Published: March 09, 2024 5:05 PM

अयोध्येत राम मंदिरा प्रमाणे बोरिवलीत उभारले शिवमंदिर, माजी राज्यपाल राम नाईक.

मनोहर कुंभेजकर, मुंबई : महाराष्ट्र राजपत्र १९०९ - १९१० नुसार मंडपेश्वर गुंफेचा इतिहास इ.स.८ व्या शतकापासून आहे.येथील गर्भगृहात शिवलिंग, गणेशाची मूर्ती आणि डाव्या बाजूला, तांडव नृत्य करत असलेले शिव आणि भिंतीवर कोरलेल्या इतर सुंदर हिंदू मूर्ती दिसतात. दुर्लक्षित असलेली ही प्राचीन आणि  गुहा सन १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी आपल्या ताब्यात घेतली आणि तेथे पुन्हा पूजा सुरू झाली.

महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय मंत्री, भाजपाचे जेष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते बोरिवली पश्चिम येथील प्राचीन ऐतिहासिक मंडपेश्वर गुहेतील शिव मंदिराच्या कायाकल्प प्रकल्पाचे उद्घाटन काल रात्री संपन्न झाले.

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सुमारे १५०० वर्षे जुने असलेल्या बोरिवली पश्चिम येथील मंडपेश्वर गुंफेला नवा लूक देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. खासदार शेट्टी यांच्या खासदार निधीतून आणि स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्या सहकार्याने येथील गुंफेचे सुशोभिकरण करण्यात आले असून तीन दिवसीय मंडपेश्वर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पुरातत्व विभाग, लोकसभेचे पटल, स्थानिक महाराष्ट्र राज्य प्रशासन अशा सर्व आघाड्यांवर खासदार गोपाळ शेट्टी यांनी सतत पाठपुरवठा करून लोकसभेत  पत्रव्यवहार केला. मंडपेश्वर लेणी शिवमंदिराच्या सुशोभीकरण व विकासासाठी केंद्रीय मंत्री आणि संबंधितांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे दुर्लक्षित गुंफेच्या सुशोभीकरण आणि विकासासाठी मंजुरी आणली .परिणामी  मंडपेश्वर लेणी शिवमंदिराचा सुशोभीकरण आणि विकास प्रकल्प येथे भव्य स्वरुपात उभारला आहे.

येथे तीन दिवसीय महा शिवरात्री महोत्सव आयोजित केला होता. दि,७ मार्च रोजी सायंकाळी 18  किलो चांदीच्या शिवलिंगाची स्थापना खा. गोपाळ शेट्टी आणि उषा शेट्टी यांनी माजी आमदार घनश्याब दुबे, समाजसेवक किरण पटेल यांच्या उपस्थितीत केली.तीन दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करताना,  राम नाईक म्हणाले की, जसे अयोध्येतील  मंदिर उभारले आहे तसेच बोरिवलीतील शिव मंदिर येथे उभारले आहे.भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये, या गुहेच्या देखभाल आणि विकासासाठी आम्ही माजी केंद्रीय मंत्री  अनंत कुमार  येथे बोलावून कायाकल्प आणि विकासासाठी असे प्रयत्न सुरू केले होते. कै.डॉ.वासुदेव शृंगी, कै.शरद अग्रवाल यांची ही आठवण करून संघर्ष केला असे विषद करत त्यांनी जुन्या आठवणी विषद केल्या.भविष्यात माझी काही गरज पडली तर मी मदत करेन असे आश्वासन त्यांनी दिले.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की,मंडपेश्वर उत्सव समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा संघर्ष केला.मंडपेश्वर लेणी संकुलात पाणी, वीज, पदपथ, रुद्राक्ष व बिलीपत्राच्या झाडांची लागवड, बसण्यासाठी बाकडे आदी सुशोभीकरणाची अनेक कामे पूर्ण झाली असून पुढील कामही सुरू आहे.मंडपेश्वर गुंफा शिवमंदिराचे सुशोभीकरण झाले असून येथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आगामी काळात मंडपेश्वर लेणी शिवमंदिरासह एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊन भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनेल असा विश्वास खासदार शेट्टी यांनी व्यक्त केला.आगामी काळात मंडपेश्वर गुंफा येथील शिवमंदिरासह एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊन भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वास्तूच्या जडणघडणीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या माजी आमदार घनश्याम दुबे, संतोष सिंह, हरीश शेट्टी, मुकेश भंडारी, विकल जी, उत्सव समितीचे अध्यक्ष मधुकर भांडारकर, रजनी अग्रवाल, अँड. जयप्रकाश मिश्रा, करुणाशंकर ओझा., डॉ. योगेश दुबे, मनुभाई शाकवाला, विश्व हिंदू परिषदेचे रमेश शहा, रामकृपाल उपाध्याय, नीलाबेन सोनी, विनोद शास्त्री आणि अनेक मान्यवर समाजसेवक आणि देणगीदारांचा राम नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या की,मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सहकार्याची सविस्तर माहिती दिली. याग्निक यांचे ही यावेळी भाषण झाले. या तीन दिवस महोत्सवात भरतनाट्यम नृत्य, अखंड रामायण, लघु रुद्र, हिंदी भक्ति संगीत असे अनेक  सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.श्रीकांत पांडे आणि विनोद शास्त्री यांनी तीन दिवस मंचाचे संचलन केले.

टॅग्स :मुंबईमहाशिवरात्री