Join us  

शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा - भाई जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2023 7:08 PM

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून दंगली सदृश्य परिस्थिती संभाळण्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार अपयशी ठरलेले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून महाराष्ट्रात दंगलीचे प्रमाण वाढलेले आहे. अहमदनगर, कोल्हापूर, संगमनेर तसेच महाराष्ट्रातील काही भागात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोक भयभीत झालेले आहेत. अचानक औरंगजेब बाहेर येऊ लागला आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रात होत आहे आणि हे सरकार अजून कोणतीही कठोर कारवाई करताना दिसून येत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून दंगली सदृश्य परिस्थिती संभाळण्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार अपयशी ठरलेले आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला.

महाराष्ट्रातील महिला अजिबात सुरक्षित नाही. चर्चगेट येथील वसतिगृहातील दुर्दैवी घटना आणि मीरा रोड येथील घडलेली भयानक घटना त्याचेच उदाहरण आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या काळात राजकीय नेते सुद्धा सुरक्षित नाही. याआधी आपल्या महाराष्ट्रात असे कधीच झाले नव्हते.धमकी देणाऱ्यांना अजून पर्यंत अटक झालेली नाही. पोलिसांवर या सरकारचाच दबाव आहे कि काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

या सगळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी  भाई जगताप यांनी केली. भाई जगताप पुढे म्हणाले की, आमचे महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात अडीच वर्षे सरकार होते. परंतू तेंव्हा एकही दंगल घडलेली नाही किंवा कधीच दंगल सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली नव्हती. भाजप जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेव्हाच कशा दंगली घडतात. निवडणूका जवळ आल्या की, भाजप सरकार दंगली घडविण्याचे कट कारस्थान करत आलेले आहेत.

हिंदू- मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणे, जातीयवादाला खत पाणी घालणे हेच भाजप करत आलेले आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन महाराष्ट्रातील  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली, तरी  हे सरकार कोणतीच कारवाई करत नाही, याचा त्यांनी निषेध केला. निलेश राणे यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारने ताबडतोब कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :अशोक जगताप