Join us  

प्ले ग्रुपमध्ये शिक्षिका मुलांना धरून आपटायच्या, पालकांच्या तक्रारीनंतर दोघींवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2023 7:09 AM

आरोपींना पाेलिसांकडून नोटीस, CCTV मध्ये घटना कैद

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांदिवली पश्चिमच्या रायम्स अँड रंबल या प्ले ग्रुपमध्ये लहानग्यांना मारहाण करणे, उचलून आपटणे, हाताला धरून फरफटत नेणे, चिमटे काढणे आणि डोक्यावर मारणे असे विकृत प्रकार शिक्षिकांकडून सुरू होते. घटनास्थळाच्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कांदिवली पोलिसांनी दोन शिक्षिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना नोटीस बजावल्याचे वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

कांदिवली पश्चिमेला राहणाऱ्या एका पालकाने त्यांचा २ वर्षांचा मुलगा नमन (नावात बदल) यास कांदिवली पश्चिमेच्या एमजी रोडवरील रायम्स अँड रंबल या प्ले ग्रुपमध्ये टाकले. जीनल छेडा, मेघना जोशी आणि विराज उपाध्याय यांनी सप्टेंबर, २०२२ मध्ये हा प्ले ग्रुप सुरू केला होता. जेथे आरोपी जिनल छेडा आणि तिची सहशिक्षिका भक्ती शहा काम करत होत्या.

तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नमन सप्टेंबरपासून प्ले ग्रुपमध्ये जातो. मात्र काही दिवसांपासून तो फार चिडचिडा झाला होता आणि घरातील लोकांना मारण्यासाठी धावायचा. त्यामुळे तक्रारदार चिंतेत होते आणि त्यांनी ही काळजी अन्य पालकांकडे बोलून दाखवली. तेव्हा त्यांच्याही मुलांच्या स्वभावात असा फरक पडल्याचे त्यांनी तक्रारदाराला सांगितले. तेव्हा तक्रारदाराने प्ले ग्रुपचे संचालक जोशी आणि उपाध्याय यांना माहिती दिली. तेव्हा वर्गातील एखादा मुलगा चुकीची ॲक्टिव्हिटी करत असावा त्यामुळे मुले अशी वागतात, असे त्यांना सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज पाहून बसला धक्का

वर्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा शिक्षिकांचे कृत्य पाहून पालकांना धक्काच बसला.  १ जानेवारी, २०२३ ते २७ मार्च २०२३ या तीन महिन्यांच्या फुटेजमध्ये शिक्षिका जीनल आणि भक्ती या मुलांना मारहाण करत असताना दिसल्या. इतकेच नव्हे तर मुलांना त्या हाताला धरून फरफटत न्यायच्या, गालावर चिमटे काढायच्या, त्यांच्या डोक्यात पुस्तक मारायच्या. त्यांना उचलून बाजूला आपटायच्या. या प्ले ग्रुपमध्ये २८ मुलांनी प्रवेश घेतल्याचे पाेलिसांनी सांगितले.

आरोपींना पाेलिसांकडून नोटीस

- कांदिवली पोलिस ठाण्यात दोन्ही शिक्षकांच्या विरोधात बाल न्याय अधिनियम २००० चे कलम २३ अंतर्गत (मुलांची काळजी आणि संरक्षण) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - त्यास कांदिवली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) दीपशिखा वारे यांनी दुजोरा दिला. दोघींना नोटीस दिल्याचेही वारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :कांदिवली पूर्वमुंबई