Join us  

राजावाडीत नातेवाइकांचा आक्रोश, स्वकीयांच्या आठवणींनी कंठ दाटला

By संतोष आंधळे | Published: May 15, 2024 8:47 AM

उत्तरीय तपासणीनंतर सर्व मृतदेह नातेवाइकांकडे केले सुपुर्द

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर येथील दुर्घटनेत १४ नागरिक मृत पावले असून, त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मंगळवारी दुपारपर्यंत उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सर्व मृतदेह नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आले. दिवसभर नातेवाईक आक्रोश करतानाचे चित्र येथे पाहायला मिळत होते. अनेक जण मृतदेह बाहेरगावी नेण्यासाठी व्यवस्था कशी करायची, या विवंचनेत होते.

बायकोशी नुकतंच बोलणं झालं होतं...

पूर्णेश जाधव हे टुरिस्ट ड्रायव्हर असून, ठाणे येथील रहिवासी आहेत. ठाण्यातून भाडे घेऊन त्यांनी प्रवाशाला सोडले, त्यानंतर ते बायकोसोबत फोनवर बोलले. सीएनजी भरण्यासाठी ते पंपावर उभे होते. त्यावेळी दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांचे मित्र विशाल गायकवाड यांनी दिली. आम्ही सगळे मित्र, त्यांचे नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी आलो आहोत.

पंपावरील कामगाराची मुलगी अनाथ झाली

सचिन यादव दोन वर्षांपासून पेट्रोलपंपावर कामाला होता. दीड वर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याला तीन महिन्यांची मुलगी आहे. सरकारच्या पाच लाखांच्या मदतीने त्याच्या कुटुंबीयांचे नुकसान भरून येणार आहे का, असा सवाल सचिनचे काका अरविंद यादव यांनी केला. टीव्हीवर आम्ही बातमी पाहिली. आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. लोकांना ढिगाऱ्याखालून काढले जात होते. मलासुद्धा आशा होती की, सचिन बाहेर पडेल. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याला बाहेर काढण्यात आले नव्हते. पोलिसांनी मृतदेह थेट राजावाडी रुग्णालयाच्या शेजारील शवविच्छेदन केंद्रात आणले होते. त्यामध्ये सचिन असल्याचे आम्हाला कळाले, असे त्यांनी सांगितले. त्याचे आईवडील उत्तर प्रदेशात असतात. त्यांना इकडे बोलवावे लागेल अन्यथा त्याचा मृतदेह आम्हाला गावी न्यावा लागणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

अजूनही माझ्या मुलाच्या मोबाइलची रिंग वाजत आहे...

आमचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्या कामासाठी माझा मुलगा सूरज चौहान आणि भाऊ धनेश चौहान हे टॅक्सी घेऊन मुंब्रा येथे जाण्यास निघाले होते. सीएनजी भरण्यासाठी ते पंपांवर थांबले, नेमकी त्यावेळीच दुर्घटना घडली. टॅक्सी ड्रायव्हर बशीर अहेमद अली हनीफ शेख हे आमच्या सोबत अनेक वर्षे काम करत होते. त्या तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला. माझा मुलगा शोधण्यासाठी मी मुलाला फोन लावला तर त्याचा फोन सुरु होता, मात्र कुणी घेतला नाही. त्यानंतर मात्र संध्याकाळी पोलिसांनी तिघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठविले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदन केंद्रात आहे, मात्र त्याचा फोन अजूनही सुरूच आहे. मनात वाटतं की, तो फोन उचलून माझ्याशी बोलेल, डोळ्यात आलेल्या अश्रृंसह महेश चौहान यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

सीएनजी भरण्यासाठी पंपावर आले होते...

मोहम्मद अक्रम गेली २० वर्षे रिक्षा ड्रायव्हर होते. ते पंपावर नेहमीप्रमाणे सीएनजी भरण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत त्यांचाही मृत्यू झाला. मोहम्मद अक्रम यांचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नव्हती. अनेक वर्षे ते या पंपावर गॅस भरण्यासाठी यायचे. मात्र, अशी घटना घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे मोहम्मद राजा यांनी सांगितले.

 

टॅग्स :घाटकोपरमुंबई