Join us  

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे नागरिक त्रस्त

By मनोहर कुंभेजकर | Published: April 19, 2024 5:47 PM

गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर नागरिकांना फेरीवाल्यांच्या आणि त्यात उभ्या असलेल्या रिक्षावाल्यांच्या गर्दीतून वाट काढत तारेवरची  कसरत करावी लागते.

मुंबई - उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात फेरीवाल्यांच्या विळख्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे.महापालिका प्रशासन लक्ष देत नाही,तर लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करतात.यामुळे गेल्या काही वर्षांत या मतदार संघातील जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या सहा विधानसभा क्षेत्रात फेरीवाल्यांच्या वाढत्या समस्येमुळे नागरिकांना धड रस्त्यावर चालता येत नाही.

गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर नागरिकांना फेरीवाल्यांच्या आणि त्यात उभ्या असलेल्या रिक्षावाल्यांच्या गर्दीतून वाट काढत तारेवरची  कसरत करावी लागते. तीच परिस्थिती गोरेगाव पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर आहे.स्टेशन बाहेरचे रस्ते, पदपथ देखिल फेरीवाल्यांनी सोडले नाही अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वाढत्या फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाने ठोस नियोजन केले नाही उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील परिस्थिती येत्या काही वर्षात हाताबाहेर जाईल की काय अशी भीती गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी व्यक्त केली.पालिकेच्या पश्चिम उपनगराच्या संबंधित अतिरिक्त आयुक्त आणि पालिका उपायुक्तांनी रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांच्या वाढत्या अतिक्रमणाकडे गांभीर्याने लक्ष देणे तितकेच गरजेचे असल्याचे मत चितळे यांनी व्यक्त केले.

अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर तर फेरीवाल्यांच्या सुळसुळाट आहे.पूर्वी अंधेरीच्या चप्पल गल्लीतून जयप्रकाश रोड क्रॉस करून रिक्षा अंधेरी रेल्वे स्थानकावर येत होती.मात्र गेल्या दशकात येथील फेरीवाल्यांनी आपली दुकाने दुतर्फा वाढवल्याने परिणामी येथे रिक्षाच येणे बंद झाले अशी माहिती आम्ही अंधेरीकरचे अजित दिघे यांनी दिली.

फेरीवाल्यांचा प्रश्न जरी खासदारांच्या आख्यारितेत येत नसला फेरीवाल्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. खासदारांच्या आख्यारितेत जरी प्रश्न येत नसले तरी, नागरिकांच्या प्रश्नांवर रस्तावर उतरून पालिका प्रशासनाकडे दाद मागणाऱ्या उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या सारख्या खमक्या खासदारांची मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघात गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.