Join us  

कारवाईपेक्षा फेरीवाला धोरण राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 3:11 AM

फेरीवाला संघर्ष समितीची मागणी : आंदोलनाबाबत दोन दिवसांत भूमिका घेणार

कल्याण : केडीएमसीकडून सध्या सुरू असलेल्या कारवाईप्रकरणी फेरीवाला संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. कारवाई थांबवा आणि तत्काळ राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांत विशेष बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याने कारवाईवरून प्रशासन आणि फेरीवाले यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

डोंबिवलीत फेरीवाल्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर केडीएमसीने फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा पवित्रा घेतला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र लिहून त्यांच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बोडके हे स्वत: फेरीवाला कारवाईच्या वेळी रस्त्यावर उतरले होते. सातत्याने आमची कारवाई सुरू असते, असा दावा करणाºया आयुक्तांची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडल्याचेही चित्र कारवाईनंतर दिसून आले. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या कारवाईचा कल्याण-डोंबिवली शहरांतील सर्वच फेरीवाला संघटनांनी निषेध केला आहे. फेरीवाला संघर्ष समितीने तर आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे.येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत माळी यांनी दिली. राजकीय दबावाखाली आयुक्तांनी कारवाई करू नये, त्यापेक्षा राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माळी यांची आहे. फेरीवाल्यांवर सुरू असलेली एकतर्फी कारवाई पाहता त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर धोरण राबवावे, असे माळींचे म्हणणे आहे. केडीएमसी मुख्यालयात सोमवारी फेरीवाला धोरणाचे सदस्य हे सचिव सुनील जोशी यांना निवेदन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशासनाला बैठकीचे वावडे का?च्फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला मुहूर्त मिळत नसताना दुसरीकडे शहर फेरीवाला समितीच्या बैठकाही फारशा झालेल्या नसल्याकडे फेरीवाला संघटनांनी लक्ष वेधले आहे. स्थायी समितीच्या बैठका दरआठवड्याला होतात मग फेरीवाल्यांसंदर्भातील समितीच्या बैठकीचे वावडे का, असा सवाल संघटनांचा आहे.च्बºयाच वेळा आयुक्तांना वेळ नसल्याने बैठका रद्द कराव्या लागल्या, तर काही बैठकींना आयुक्त हजर नव्हते. त्यामुळे प्रशासनाला फेरीवाल्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याचा आरोप संघटनांचा आहे.धोरण अंमलबजावणीची कृती लवकरच : एकीकडे फेरीवाला धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी फेरीवाल्यांकडून होत असली तरी मागील बैठकीच्या वेळी धोरणातील काही बाबींवर हरकत घेत समितीच्या सदस्यांनी काही सूचना केल्या होत्या. परंतु, सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता सदस्यांच्या कोणत्याही सूचनांचा विचार न करता तातडीने धोरणाची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाने ठरविल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

टॅग्स :मुंबईफेरीवाले