धूमस्टाईल मोटारसायकल चालवून महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावत धुमाकूळ घालणाऱ्या टोळ्यांनी दागिने हिसकावण्यासाठी आपल्या मोटारसायकलच्या रचनेमध्ये बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत धूमस्टाईल मोटारसायकलवरून आलेले चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढत आहेत. दररोज चोऱ्या होऊनही चोरटे पोलिसांना सापडत नाहीतच. लुटारूंच्या वाहनांचे नंबरही मिळत नाहीत. अशा या लुटारूंची कल्पकता उघडकीस आली आहे. अशा चोऱ्यांसाठी उत्तम वेग असलेली व चालविण्यासाठी कम्फर्टेबल असलेली मोटारसायकल म्हणून पल्सरला पसंती दिली जात आहे. पल्सरच्या मागील सीटच्या रचनेत बदल केला जात आहे. सीटच्या मध्यभागी मजबूत पट्ट्या बसवून त्याचा वापर सोनसाखळी खेचताना केला जातो. मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या लुटारूने एका हाताने साखळी खेचताना दुसऱ्या हाताने हा पट्टा घट्ट धरलेला असतो. त्यामुळे सोनसाखळी खेचण्यासाठी त्याला वाहनाच्या गतीप्रमाणे पुरेसे बळ मिळते. शिवाय त्याला कोणी प्रतिकार केल्यास तोलही सावरता येतो.३ जानेवारीला वाशीत सोनसाखळी खेचून चोर कळंबोलीच्या दिशेने धूम ठोकत असताना वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने इरफान हुसेन (२२) हा मोटारसायकलसह हाती लागला. वाशी पोलीस त्याची चौकशी करत असताना त्याच्या मोटारसायकलमध्ये असे बदल केलेले आढळल्याचे पोलीस निरीक्षक सूरज पडवी यांनी सांगितले. सीटवर मध्यभागी बसवलेल्या पट्ट्याचा वापर सोनसाखळी खेचताना केला जात असे. गुन्हानंतर मोटारसायकल वेगाने पळवताना पाठीमागचा लुटारू हा पट्टा धरूनच तोल सांभाळत असे. इरफानच्या पल्सरच्या स्पीडमध्येही बदल करण्यात आले होते. त्यामुळे हे सोनसाखळीचोर गुन्हा केल्यानंतर धूम ठोकण्यात यशस्वी होत. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांच्याकडून चोरीच्या वाहनांचा वापर केला जातो. चोरीच्या वाहनांची नंबरप्लेट बदलून प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यात देखील धूळ फेकली जाते. इरफानने वापरलेली मोटारसायकल त्याने केरळ येथून चोरून त्यावर बनावट नंबरप्लेटही लावली होती. डोळ््याची पापणी लवते न लवते तोच मोटारसायकलीवरून आलेले सोनसोळखीचोर महिलांच्या गळ््यातील दागिने हिसकावून क्षणार्धात नजरेआड होतात. शहरात दररोज कुठे ना कुठे अशी घटना घडतच असते. या धूमस्टाईल गुन्ह्यासाठी सोनसाखळीचोर आपल्या मोटारसायकलीत सोयीचे बदल घडवू लागले आहेत.सूर्यकांत वाघमारे
शक्कल साखळीचोरांची
By admin | Updated: January 7, 2015 00:22 IST