Join us

सरकारचे दुष्काळग्रस्तांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 10, 2016 02:15 IST

दुष्काळाच्या चटक्यांमुळे मुंबईत घाटकोपरमधील भटवाडी परिसरात दाखल झालेल्या दुष्काळग्रस्त निर्वासितांकडे राज्य सरकारचे अजूनही दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

निकीता तिवारी,  मुंबईदुष्काळाच्या चटक्यांमुळे मुंबईत घाटकोपरमधील भटवाडी परिसरात दाखल झालेल्या दुष्काळग्रस्त निर्वासितांकडे राज्य सरकारचे अजूनही दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या कुटुंबांना मुंबईत कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे जाणून घेण्यासाठी ‘अ‍ॅक्शन-एड सामाजिक संस्था’ आणि ‘कॉलेज आॅफ सोशल वर्क निर्मला निकेतन’ यांनी एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात रवी जयसवाल, पूजा लवटे, सायली पेंढारकर, प्रियाशा पाईत, स्नेहा महाजन, इफराइन ख्रिश्चन, रेंझन रॉड्रिक हे सात विद्यार्थी सहभागी झाले होते.भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांतून अनेक कुटुंबे तात्पुरत्या वास्तव्यासाठी मुंबईत दाखल झाली आहेत. या शेकडो कुटुंबांचे मुंबईतही हाल सुरूच असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार दररोज मराठवाड्यातील विविध गावांतून सुमारे आठ कुटुंबे मुंबईत स्थलांतरित होत आहेत. या कुटुंबांना त्यांच्या गावाकडे जगणेही कठीण होत असल्याने ते मुंबईत मोठ्या आशेने आले आहेत. इथे किमान दोन वेळेचे जेवण आणि रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा त्यांना होती, पण ते मिळणेही त्यांना कठीण बनत आहे. मुंबईत आल्यानंतर प्रत्यक्षात मूलभूत सोईसुविधांपासूनदेखील त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राजकीय पक्षांकडून होणारी मदतदेखील तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे या दुष्काळग्रस्तांचे म्हणणे आहे. सर्वेक्षणानुसार घाटकोपरमध्ये सध्या ४०० पेक्षा जास्त कुटुंबातील १२०० हून अधिक लोक आलेले आहेत. १२०० लोकांसाठी केवळ ८ फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या शौचालयांत स्वच्छतेची वानवाच आहे. एका महिन्यापूर्वी या दुष्काळग्रस्तांना ४ ते ५ दिवसांतून एकदा पाणी मिळत होते. प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्याने पुरेसे पाणी सध्या मिळू लागले आहे. ‘लोकमत’ने ही हा विषय सातत्याने लावून धरला आहे. महिलांना अंघोळ करण्यासाठी जागा नसल्यामुळे पहाटे अंधारात अंघोळ उरकण्यासाठी महिलांची धांदल उडते. अनेक कुटुंबे महिन्याभरापूर्वीच मुंबईत स्थलांतरित झाल्याने, काही पाल्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. सरकारी अंगणवाड्यांमध्ये या पाल्यांना प्रवेश देण्यास स्थानिक शाळांनी नकार दिला आहे. साथीच्या आजारांच्या भीतीने या मुलांना प्रवेश नाकारला जात असल्याचे या दुष्काळग्रस्तांचे म्हणणे आहे. शैक्षणिक वर्ष वाया गेल्यामुळे या मुलांचे पालक चिंतेत आहेत. भविष्याचे काय होणार? असा प्रश्न बहुतेकांना भेडसावत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. जी कुटुंबे वर्षभरापासून परिसरात राहत आहेत, त्यापैकी काही कुटुंबातील मुले महानगरपालिकेच्या विद्यालयात शिक्षण घेत आहेत. पावसाने आमच्यावर कृपा केली, तर आम्ही आमच्या गावी पुन्हा जाऊ, असे काही कुटुंबांनी बोलून दाखविले. मात्र, स्थलांतरितांपैकी काही कुुटुंबांचे गावी घर किंवा कुठल्याही प्रकारची शेतजमीन नसल्याने, गावी पुन्हा जाऊन उपयोग नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले.