Join us  

हिंमत असेल तर सीबीआय चौकशी करा

By admin | Published: April 21, 2015 5:42 AM

बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा हिंमत असेल तर खुशाल सीबीआय चौकशी करा, असे थेट आव्हान माजी मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

नवी मुंबई : बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा हिंमत असेल तर खुशाल सीबीआय चौकशी करा, असे थेट आव्हान माजी मंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. रविवारी नेरूळ येथे झालेल्या युतीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली.महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले जात आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेछूट आरोप करून मतदारांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे सर्वेसर्वा आहेत. त्यांना महापालिकांच्या कारभाराची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. त्यासाठी महापालिकेची सत्ता कशाला हवी आहे? आपले अधिकार वापरून नवी मुंबईच नव्हे, तर मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यातील सर्व महापालिकांच्या आतापर्यंतच्या कारभाराची चौकशी करावी. इतकेच नव्हे, तर मागील १३ वर्षांत मंत्री म्हणून मी काम केलेल्या सात खात्यांचीही चौकशी करावी. त्यातील एकाही प्रकरणात दोषी आढळल्यास आपण शिक्षा भोगायला तयार असल्याचे नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले. माझ्या नावावर एकही दगडखाण नाही. नातेवाइकांच्या नावावर असलेल्या दगडखाणी १५ वर्षांपूर्वीच बंद झाल्या आहेत. असे असतानाही रॉयल्टी बुडविल्याचा हास्यास्पद आरोप केला जात असल्याचे ते म्हणाले. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. आम्ही सुसंस्कृत आहोत. गाडण्याची भाषा आम्हाला जमत नाही. पहिल्यांदा ताब्यात असलेल्या मुंबई, ठाणे व कल्याण महापालिकेचा कारभार सुधारा, मगच नवी मुंबईत सत्तेचे स्वप्न बघा, असा टोला त्यांनी लगावला.