Join us  

विदर्भाचा मुद्दा आला तर संमेलन उधळू

By admin | Published: September 28, 2016 2:22 AM

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डोंबिवली शहराला मिळाला, ही आनंदाची आणि भूषणावह बाब आहे. साहित्य संमेलनात साहित्याचा, भाषेचा विचार मांडला

- मुरलीधर भवार,  डोंबिवली

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डोंबिवली शहराला मिळाला, ही आनंदाची आणि भूषणावह बाब आहे. साहित्य संमेलनात साहित्याचा, भाषेचा विचार मांडला जायला हवा. पण जर या व्यासपीठाचा वापर करून कोणी अखंड महाराष्ट्राचे दोन तुकडे करण्याचा, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला, तशी मागणी केली; तर मनसे आपल्या स्टाईलने हे संमेलनच उधळून लावेल, असा इशारा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील यांनी दिला.डोंबिवलीसारखे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर आणि आगरी युथ फोरमसारख्या संस्थेचे आयोजन असा छान योग जुळून आल्याने साहित्य संमेलनाला गालबोट लागू नये, अशी आमचीही इच्छा आहे. त्यामुळेच महामंडळ, संमेलनाध्यक्ष, आयोजकांसह सर्व संबंधितांनी याचे भान ठेवत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आणू नये. तसा तो आणला आणि त्यातून संमेलनाला गालबोट लागले; तर त्याला सर्वस्वी तेच जबाबदार असतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. साहित्याच्या संमेलनात जसा साहित्याचा सर्वांगीण विचार अपेक्षित आहे, तसाच मराठी भाषेचा, तिच्या विकासाचा विचार व्हावा, अशी मनसेची इच्छा आहे. महाराष्ट्राच्या सीमाभागात असलेली बेळगाव, कारवार आणि निप्पाणी ही शहरे महाराष्ट्रात आलेली नाहीत. या सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, अशी मागणी सतत होते. संमेलनातही तसे ठराव मंजूर होतात. एकीकडे ती भूमिका घेतानाच जर कोणी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून अखंड महाराष्ट्र तोडण्याचा विचार करीत असेल, तर त्यांचा समाचार यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यांच्या भूमिकेला अनुसरूनच आमचेही पुढचे पाऊल असेल. या भूमिकेविरोधात जर संमेलनात भूमिका घेतली गेली, तर ती मनसे स्टाईलने हाणून पाडली जाईल, असा इशाराच पाटील यांनी दिला. युवा संमेलन आमच्याकडे सोपवाडोंबिवलीत साहित्य, कला आणि संगीत वाढीस लागावे. नागरिकांची सांस्कृृतिक भूक भागावी, यासाठी मनसे दरवर्षी ‘जत्रा’ आयोजित करते. तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असतो. लाखो लोक त्यात सहभागी होतात. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम रसिक आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून ही जत्रा पार पडते. मराठी साहित्य व सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, यासाठी मनसेचे एक पाऊल सदैव पुढे असते. साहित्य संमेलनाच्या आधी वातावरणनिर्मितीसाठी किंवा प्रत्यक्ष संमेलनात मुले, युवा, महिलांसाठी स्वतंत्र छोटेखानी संमेलने घेण्याचे ठरले, तर मनसेकडे युवा मंडळी जास्त असल्याने एक दिवसाच्या युवा संमेलनासाठी मनसेचा पुढाकार असेल, असे सांगत पाटील यांनी आयोजकांना आश्वस्त केले. मराठी भाषेच्याच विकासाचा विचार मांडला जाणार असल्याने साहित्य संमेलनास मनसेचा शंभर टक्के पाठिंबा आहे. संमेलनाच्या आयोजकांनीही मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या मनसेला विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. ‘तिथे’ नेते नकोतचसाहित्याच्या व्यासपीठावरून राजकारण केले जाऊ नये. साहित्य आणि राजकारण या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांसाठी खुर्चीच असू नये. राजकीय व्यक्ती संमेलनाला आल्या, तरी त्यांना संमेलनातील प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसण्याचा मान देणेच योग्य राहील. त्यांची लुडबुड असता कामा नये, अशा शब्दांत पाटील यांनी राजकारण्यांना फटकारले. स्वागताध्यक्षपद वझेंकडे असावेसाहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद हा कळीचा मुद्दा ठरत असल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले, संमेलन आयोजनासाठी आगरी युथ फोरमने पुढाकार घेतला आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान आगरी युथ फोरमला मिळणे अपेक्षित आहे.अभिजात दर्जा मिळावामराठी भाषेच्या विकासाच्या ठरावांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहे. त्यासाठी संमेलनातून पाठपुरावा केला जायला हवा. तसा आग्रह मनसे धरेल, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. भावे, नवरेंची नावे द्यानवकथाकार पु. भा. भावे आणि लेखक, नाटककार, पटकथाकार शं. ना. नवरे यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांची नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संमेलननगरीला येथील दिग्गज साहित्यिकांचे नाव देण्याची भूमिका मांडली.