Join us  

ईव्हीएम बंद न केल्यास येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 2:53 AM

‘राष्ट्रीय जनआंदोलन’चे जनतेला आवाहन

मुंबई : देशभरातील ईव्हीएम बंद करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ईव्हीएम बंद केले नाही, तर येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाका, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांनी राजकीय पक्ष व जनतेला केले. मुंबई मराठी पत्रकार संघात बुधवारी ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाच्या वतीने ‘ईव्हीएम आणि सत्य’ या विषयावर बैठक घेण्यात आली होती. या वेळी कोळसे पाटील म्हणाले की, देशात सर्वांत मोठी ताकद ही जनतेची आहे. त्यामुळे जनतेचे एकमत ईव्हीएमविरोधी असल्यास ईव्हीएम बंद होण्यास विलंब लागणार नाही. आपल्याला आपलीच जनशक्ती न्याय देऊ शकते. जगभरातील २०० देशांपैकी फक्त १८ देश ईव्हीएम मशीनचा वापर करीत आहेत. बाकी सर्व देशांनी ईव्हीएमला नकार दिला आहे. ज्या देशात ईव्हीएम बनते, तिथेच ईव्हीएमचा वापर केला जात नाही. ईव्हीएममधील चीप हॅक करून मतांची हेराफेरी केली आहे, असे कोळसे पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाचे समन्वयक फिरोज मिठीबोरवाला म्हणाले की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा वापर सुरू करणे आवश्यक आहे. कारण मोदी सरकारने जर २५० पर्यंत जागा मिळविल्या असत्या, तर त्यांचा विजय मान्य केला असता. मात्र ३०३ जागा मिळणे यात शंका निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला जागृत करण्यासाठी आंदोलन करणार आहे. ही निवडणूक ईव्हीएम मशीन हॅक करून जिंकण्यात आली आहे. त्यामुळे बॅलेट पेपरचा वापर करणे योग्य आहे. आगामी निवडणुकीमध्ये बॅलेट पेपर वापरूनच मतदान करण्याची पद्धती सुरू होणे आवश्यक आहे. मतदान झालेल्या विभागवर याद्या दाखवायला आयोग तयार नाही. निवडणुकीपूर्वी २० लाख ईव्हीएम मशीनचे जीपीएस ट्रॅकिंग रेकॉर्ड मतदारांसमोर आणायला निवडणूक आयोग नकार देत आहे. मतदाराला आपले मत कुणाला जात आहे, याची माहिती मिळणे आवश्यक आहे. मात्र अशी माहिती मिळत नाही. मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अजून प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाला दत्तक घेण्यात आले आहे. त्यामुळे आयोग शांत बसला आहे. आयोगाने मतदारांच्या मतांचा हिशोब दिला पाहिजे, असे मतही या वेळी राष्ट्रीय जनआंदोलनने व्यक्त केले.

टॅग्स :निवडणूकविधानसभा